ओटाव्हा(Iran-Israel war): इराणने कधीही अण्वस्त्रे बाळगू नये, असे एकमताने संयुक्त निवेदन जी-7 बैठकीत सर्वच राष्ट्रांनी जारी केले आहे. इराण अण्वस्त्रसज्ज बनल्यास चिंतेचा विषय ठरू शकतो, असा सूर जी-7 बैठकीत आळवण्यात आला. ५१व्या जी-7 शिखर परिषद १५ ते १७ जून रोजी कॅनडातील अल्बर्टा येथे आयोजित केली होती. यात फ्रान्स, अमेरिका, ब्रिटन, जर्मनी, जपान, इटली आणि कॅनडा आणि युरोपियन युनियन सहभागी असणाऱ्या सात देशांचा गट आहे. भारत हा अतिथी देश म्हणून या परिषदेत सहभागी झाला आहे.
सोमवार, दि.१६ जून रोजी, जी-7 शिखर परिषेदेत इराण-इस्त्रायल युध्दावर सहभागी देशांनी चिंता व्यक्त केली आहे.
G7 नेत्यांनी संयुक्त निवेदन जारी करत म्हटले आहे की, इराण कधीही अण्वस्त्रे बाळगू शकत नाही. या परिषेदेत नेत्यांनी मध्य पूर्व राष्ट्रांतील शत्रुत्वाची धार कमी करण्याचे आवाहन केले, ज्यात गाझामधील युद्धबंदींचाही समावेश आहे. जिथे ७ ऑक्टोबर रोजी २०२३ मध्ये हमासने केलेल्या दहशतवादी हल्ल्याच्या प्रत्युत्तरात इस्त्रायलकडून स्वत:चे रक्षण करण्यासाठी केलेले युध्द हे आजपर्यंत सुरू आहे.
या युध्दामुळे जगभरात अंशाततेचे पर्व सुरू आहे. पण पुढे जाऊन या नेत्यांनी इस्रायलच्या समर्थनात मत व्यक्त केले आहे. इस्रायलला धोका निर्माण करणाऱ्या कोणत्याही हल्ल्यापासून स्वतःचे रक्षण करण्याचा अधिकार आहे, असेही ते म्हणाले.
ट्रम्प यांचा इराणला इशारा!
उशीर होण्यापूर्वी इराणचा अण्वस्त्र कार्यक्रम रोखण्याची गरज अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बोलून दाखवली. “इराणने त्यांच्या अणुमहत्त्वाकांक्षेवर स्वत:ला आवरावे, त्यांच्याकडे आता दिवस कमी आहेत, त्यासाठी त्यांना इस्रायलसोबत करार करावा लागेल, असेही ट्रम्प म्हणाले.
काय घडतयं?
आतापर्यंत, इस्रायलने अनेक इराणच्या अण्वस्त्र स्थळांना लक्ष्य केले आहे परंतु इराणचे फोर्डो युरेनियम नष्ट करू शकलेले नाही. कारण इराणने त्या अण्वस्त्रला खोलवर गाडले आहे. यात इस्रायल अमेरिकेचा बंकर-बस्टिंग बॉम्ब प्रणालीचा वापर करण्याची शक्यता आहे,जो की खोलवर गाडलेल्या ठिकाणापर्यंत जाऊन लक्ष्य करू शकतो.
...तर इराणच्या नागरी वस्त्यांचे नुकसान!
गेल्या पाच दिवसांत, इस्रायलने इराणच्या अनेक लष्करी ठिकाणावर हल्ले केले आहेत. परंतु; त्यांच्या अण्वस्त्र ठिकाणापर्यंत पोहचता आले नाही, पण इस्रायल तिथपर्यंत पोहचवू शकतो आणि अण्वस्त्र उध्वस्त झाले तर इराणच्या नागरी वस्तीचे अतोनात नुकसान होईल. आतापर्यंतच्या हल्ल्यांदरम्यान इराणला त्याच्या लष्करी आणि नागरी वस्तीना अनेक आत्मघाती हादरे बसले. त्यात हजारो लोक मृत्युमुखी पडले. त्याचा लष्करप्रमुख या हमल्यात मारला गेला, असे इराणकडूनच स्पष्ट करण्यात आले आहे.