आषाढी वारीसाठी मोफत टोलपास कसा मिळवाल?

17 Jun 2025 17:25:46

पंढरपूर : टाळ-मृदंगाच्या गजरात “माऊली माऊली!”चा निनाद करीत पंढरपूरच्या दिशेने निघालेल्या संतांच्या वारीला राज्य सरकारने टोलमाफीचा भाविक नमस्कार अर्पण केला आहे. आषाढी एकादशीच्या निमित्ताने दि. १८ जून ते १० जुलै २०२५ या कालावधीत ९० मान्यताप्राप्त पालख्यांसह जाणाऱ्या भाविकांच्या वाहनांना टोलमुक्त प्रवासाची सुविधा देण्यात आली आहे. श्रद्धेच्या वाटचालीला अडथळा ठरू नये म्हणून शासनाने हा निर्णय घेतला असून, या सवलतीचा लाभ घेण्यासाठी विशेष टोलपास अनिवार्य राहणार आहे.

कुठे मिळेल पास?

   - टोलमुक्त पास परिवहन विभाग, वाहतूक पोलिस आणि प्रादेशिक परिवहन कार्यालयांमार्फत (आरटीओ) उपलब्ध करून दिले जातील.  
   - स्थानिक पोलिस ठाणे, वाहतूक पोलिस चौकी आणि RTO कार्यालयांमध्ये हे पास मिळतील. त्यासाठी अर्ज करावा लागेल.
   - पासवर वाहनाचा क्रमांक, मालकाचे नाव, प्रवासाच्या तारखा आणि "आषाढी एकादशी २०२५" असा मजकूर नमूद असेल.  
   - पास विनामूल्य दिले जाईल, परंतु त्याची नोंद संबंधित यंत्रणेकडे ठेवली जाईल, जेणेकरून टोल ठेकेदारांना नुकसानभरपाई देता येईल.
   - हा पास पंढरपूरला जाण्यासाठी आणि परत येण्यासाठी दोन्ही प्रवासांसाठी वैध असेल.  

कोणत्या वाहनांना सवलत?

   - ९० मान्यताप्राप्त पालख्या, वारकरी आणि भाविकांच्या हलक्या आणि जड वाहनांना ही सवलत लागू असेल.  
   - महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसनाही टोलमाफी मिळेल.
   - टोलमुक्त पास टोलनाक्यावर दाखवणे बंधनकारक आहे. पास नसल्यास सवलत मिळणार नाही.  
   - फास्ट टॅग वापरणाऱ्यांनी टोलनाक्यावर पास दाखवावा, जेणेकरून फास्ट टॅग वरून पैसे कापले जाणार नाहीत. यासाठी फास्ट टॅग वर अॅल्युमिनियम फॉइल लावणे किंवा मोबाइल फोन जवळ ठेवण्याचा सल्लाही देण्यात आला आहे.
   - पास मिळवण्यासाठी आणि त्याच्या उपलब्धतेबाबत माहिती देण्यासाठी पोलिस आणि परिवहन विभाग जनजागृती मोहीम राबवणार आहे.

 टोलमाफी लागू असलेले मार्ग

१) मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग  
२) मुंबई-बेंगलोरु राष्ट्रीय महामार्ग  
३) पुणे-सोलापूर  
४) पुणे-सातारा-कोल्हापूर  
५) इतर राष्ट्रीय आणि राज्य महामार्ग, प्रमुख जिल्हा मार्ग आणि ग्रामीण रस्ते  

अतिरिक्त सुविधा  

रस्ते दुरुस्ती : वारीच्यामार्गावरील रस्त्यांवरचे खड्डे भरणे, सूचनाफलक लावणे आणि सुशोभीकरणाचे काम तातडीने पूर्ण केले जाईल.  

सुरक्षा आणि आपत्कालीन व्यवस्था : प्रत्येक २५ किलोमीटर अंतरावर रुग्णवाहिका, क्रेन आणि रस्ते दुरुस्तीचे साहित्य उपलब्ध असेल.  

वाहतूक व्यवस्थापन : टोलनाक्यांवर वाहतूक कोंडी टाळण्यासाठी अतिरिक्त मनुष्यबळ, ट्रॅफिक वॉर्डन आणि हँडहेल्ड मशीन्सचा वापर केला जाईल.  


Powered By Sangraha 9.0