शनि शिंगणापूर : 114 मुस्लीम कर्मचार्‍यांना डच्चू!

17 Jun 2025 11:15:43

Shani Shingnapur 114 Muslim employees arrested
 
हिंदू म्हणजे काफीर, मूर्तिपूजा म्हणजे ‘शिर्क’ अशी शिकवण देणार्‍या इस्लामचेच काही अनुयायी चक्क हिंदू मंदिरांमध्ये काम करतात. एवढेच नव्हे तर हिंदूंच्या दानधर्मातून मिळालेल्या उत्पन्नावरच त्यांची रोजीरोटी चालते. हा प्रकार महाराष्ट्रातील शनि शिंगणापूरच्या मंदिरात उघडकीस आला आणि आंदोलनाच्या इशार्‍यानंतर देवस्थाननेही कठोर कारवाई करीत, या कर्मचार्‍यांना बाहेरचा रस्ता दाखवला. त्यामुळे हा हिंदूंच्या भावनांशी, श्रद्धांशी खेळ नाही का, असाच प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होतो.
 
अहिल्यानगर जिल्ह्यातील शनि शिंगणापूर हे असंख्य शनिभक्तांचे दैवत! या शनी मंदिराचे दर्शन घेण्यासाठी महाराष्ट्रासह देशाच्या विविध भागांमधून मोठ्या संख्येने भाविक दाखल होतात. या देवस्थानचा कारभार ‘शनि शिंगणापूर देवस्थान ट्रस्ट’कडून चालविला जातो. या देवस्थानमध्ये अन्य कर्मचारी वर्गाप्रमाणे 114 मुस्लीम कर्मचारी विविध विभागांमध्ये कार्यरत होते. खरे म्हणजे हिंदू समाजाचे देवस्थान असलेल्या आणि या देवस्थानाकडून चालविल्या जाणार्‍या अन्य संस्थांमध्ये मुस्लीम सेवकांची नेमणूक कशी काय केली गेली, असा प्रश्न हिंदू भाविकांच्या मनात निर्माण होणे स्वाभाविकच. भाजपच्या आध्यात्मिक समन्वय आघाडीचे प्रमुख आचार्य तुषार भोसले यांनी यासंदर्भात उग्र आंदोलनाचा इशारा दिला होता. त्या निदर्शनांच्या आदल्या दिवशीच मंदिर व्यवस्थापनाने 167 कर्मचार्‍यांना कामावरून कमी केले. यामध्ये 114 मुस्लीम सेवकांचा समावेश होता. गंभीर स्वरूपाची अनियमितता, बेशिस्त आणि अनुपस्थिती आदी कारणे दाखवून मंदिर व्यवस्थापनाने या सर्वांना डच्चू दिला.
 
मंदिराशी संबंधित विविध विभागांमध्ये मोठ्या प्रमाणात मुस्लीम सेवक असल्याचे पाहून भाविकांमध्ये तीव्र नाराजी पसरली होती. हे देवस्थान हिंदू समाजाचे आहे. ती काही मशीद नव्हे. या देवस्थानास कोट्यवधी भाविक भेट देत असतात. निधर्मी प्रशासनाच्या नावाखाली या मंदिराच्या आत्म्याशी तडजोड केली जात असल्याचा आरोप आचार्य तुषार भोसले यांनी केला. मंदिरातील अहिंदू सेवकांना काढून टाकण्यासाठी उग्र आंदोलन करण्याचा इशारा आचार्य भोसले यांनी दिला होता. दि. 14 जून रोजी या निदर्शनाचे आयोजनदेखील करण्यात आले होते. त्यास असंख्य शनिभक्तांनी, आध्यात्मिक गटांनी आणि अन्य धार्मिक संघटनांनी पाठिंबा दिला होता. हे आंदोलन लक्षात घेऊन मंदिराच्या विश्वस्तांनी दि. 13 जून रोजी तातडीने एका बैठकीचे आयोजन केले आणि 114 मुस्लीम सेवकांसह एकूण 167 सेवकांना कामावरून काढून टाकण्याचा निर्णय घेतला. हा सनातन धर्माचा ऐतिहासिक विजय असल्याची प्रतिक्रिया आचार्य भोसले यांनी व्यक्त केली आहे. हे आंदोलन म्हणजे, एक जातीयवादी खेळी असल्याचा आरोप काहीजणांकडून करण्यात आला. मंदिर व्यवस्थापनाने अन्य कारणे पुढे करून मुस्लीम सेवकांसह अन्य सेवकांना काढून टाकले. ज्या 114 मुस्लीम सेवकांना काढून टाकण्यात आले, त्यातील 99 सेवक गेल्या पाच महिन्यांपासून कामावरच येत नव्हते. त्यांच्यावर वारंवार नोटिसा बजावूनही ते कामावर येत नव्हते. असे असले तरी त्यांचा पगार मात्र सुरू होता. या सेवकांना काढून टाकण्याची अन्य कारणे व्यवस्थापनाकडून देण्यात आली. मात्र, धर्म हा निकष लक्षात घेऊन त्यांना काढण्यात आले नाही, असे व्यवस्थापनाकडून स्पष्ट करण्यात आले.
 
देशातील प्रत्येक मंदिराच्या प्रतिष्ठानाचे धार्मिक लेखपरीक्षण केले पाहिजे. प्रदीर्घ काळापासून देशातील आपली मंदिरे ज्यांची हिंदू धर्मावर श्रद्धा नाही किंवा ज्यांचा हिंदू धर्माशी दुरान्वयेही संबंध नाही, अशांकडून चालविली जात आहेत, याकडे ‘विश्व हिंदू परिषदे’च्या एका पदाधिकार्‍याने लक्ष वेधले, तर आचार्य तुषार भोसले यांनी शनि शिंगणापूर देवस्थानने जी कृती केली, ती म्हणजे हिंदू समाजाच्या ऐक्याचा विजय असल्याचे म्हटले आहे. ज्यांचा आमच्या देवांवर विश्वास नाही, आमच्या मूल्यांवर, आमच्या जीवनपद्धतीवर विश्वास नाही, त्यांच्या हातात आम्ही आमची मंदिरे जाऊ देणार नाही, असा इशारा आचार्य भोसले यांनी दिला आहे. देशातील प्रमुख मंदिरांचे धर्मी लेखापरीक्षण करून ती मंदिरेही अहिंदूच्या तावडीतून मुक्त करण्यात यावीत, अशी मागणी तीव्रतेने केली जात आहे.
 
बुरख्याचे दुष्परिणाम!
 
जौनपूर येथे मुस्लीम महिलांच्या संदर्भात करण्यात आलेल्या एका पाहणीनुसार, ज्या महिला बुरखा परिधान करतात, अशा महिलांमध्ये ‘ड’ जीवनसत्वाचा अभाव असल्याचे आढळून आले आहे. ज्या महिला बुरखा परिधान करतात, अशा 70 टक्के महिलांमध्ये ‘ड’ जीवनसत्वाची उणीव असल्याचे दिसून आले. पुरेसा सूर्यप्रकाश मिळत नसल्याने अशा मुस्लीम महिलांमध्ये ‘ड’ जीवनसत्वाचा अभाव असल्याचे या पाहणीचे निष्कर्ष आहेत. ‘ड’ जीवनसत्वाच्या अभावामुळे हाडे ठिसूळ होणे, हाडे मोडणे असे प्रकार घडू शकतात. उत्तर प्रदेशातील जौनपूर जिल्ह्यात करण्यात आलेल्या वैद्यकीय पाहणीचे हे निष्कर्ष आहेत. ‘ड’ जीवनसत्वाच्या अभावामुळे अशा महिलांच्या प्रकृतीसंदर्भात गंभीर समस्या निर्माण झाली आहे. उमानाथ सिंह स्वायत्त वैद्यकीय महाविद्यालयाच्या अस्थि व्यंगोपचार विभागाने डॉ. उमेशकुमार सरोज यांच्या मार्गदर्शनाखाली ही पाहणी केली. 100 हिंदू महिला आणि 100 मुस्लीम महिलांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. ‘ड’ जीवनसत्वाची कमतरता आणि त्यामुळे अस्थींवर होणारा परिणाम हा मुद्दा लक्षात घेऊनही पाहणी करण्यात आली. ‘ड’ जीवनसत्वाच्या अभावामुळे मुस्लीम महिलांमध्ये हाडे ठिसूळ होण्याचे प्रमाण अधिक असल्याचे दिसून आले. त्या तुलनेत हिंदू महिलांमध्ये हे प्रमाण कमी आढळून आले. मुस्लीम महिला बुरखा परिधान करीत असल्याने ‘ड’ जीवनसत्वाचा नैसर्गिक स्रोत असलेल्या सूर्यप्रकाशापासून त्या वंचित राहतात. ‘ड’ जीवनसत्वाची कमतरता दूर करण्यासाठी जीवनशैलीत बदल करणे आणि योग्य आहार घेणे आवश्यक असल्याचे संशोधकांनी सूचविले आहे.
प्रार्थनासभेत पाकिस्तान, चीनचे झेंडे!
 
पहलगाम घटनेनंतर पाकिस्तानसमवेतचे संबंध ताणले गेले असताना तसेच, चीनही पाकिस्तानची पाठराखण करीत असताना, पाकिस्तान आणि चीनचे झेंडे जाहीर कार्यक्रमात फडकविण्याचा प्रकार केरळमध्ये घडला आहे. कोची परिसरातील तिरीप्पुनिथुरालगतच्या उदयामपेरूर येथे ख्रिस्ती धर्मगुरूने 40 दिवसांच्या प्रार्थना सभेचे आयोजन केले होते. या प्रार्थना सभेच्या ठिकाणी चीन आणि पाकिस्तानचे ध्वज फडकविण्यात आले होते. एका स्थानिक व्यक्तीने घटनास्थळास भेट दिली असता, त्याच्या हा प्रकार लक्षात आला. या घटनेनंतर एर्नाकुलमचे भाजप नेते श्रीकुट्टन यांच्या नेतृत्वाखाली भाजप कार्यकर्त्यांनी घटनास्थळी निदर्शने केली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन तेथे लावण्यात आलेले पाकिस्तान आणि चीनचे ध्वज ताब्यात घेतले आणि गेल्या दि. 8 जून रोजी या प्रकरणी गुन्हा नोंदविला. या संदर्भात पोलिसांनी ख्रिस्ती धर्मगुरू दीपु जेकब याची चौकशी केली. आपण जागतिक शांततेसाठी या प्रार्थना उपक्रमाचे आयोजन केले होते आणि त्यानिमित्ताने अन्य 20 देशांबरोबर पाकिस्तान आणि चीनचेही ध्वज लावले होते, असा युक्तिवाद जेकब याच्याकडून करण्यात आला. मात्र, राजकीय निरीक्षक आणि राष्ट्रवादी संघटनांनी हा प्रकार अत्यंत गंभीर असल्याचे म्हटले आहे. हा प्रकार लक्षात घेता, केरळ राज्य हे राष्ट्रविरोधी तत्त्वांचा अड्डा झाला आहे, अशी प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत आहे. पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी पहलगाम हत्याकांड केल्याची घटना घडल्यानंतरही पाकिस्तान आणि चीनचा राष्ट्रध्वज ख्रिस्ती धर्मगुरूकडून प्रार्थनासभेच्या ठिकाणी फडकविला जातो, या घटनेचा जेवढा निषेध करावा तेवढा थोडाच आहे!
 
Powered By Sangraha 9.0