श्रावण महिन्यात धार्मिक सहली

17 Jun 2025 13:09:16
 
Religious trips in month of Shravan
 
मुंबई: सर्वसामान्य प्रवाशांना अधिकाधिक धार्मिक स्थळांना भेट देता यावी यासाठी ‘खासगी टूर्स अ‍ॅण्ड ट्रॅव्हल्स’ कंपन्यांनी ‘एसटी’सोबत संयुक्तपणे सहली आयोजित कराव्या. या योजनेत राज्यातील सर्व ‘टूर्स अ‍ॅण्ड ट्रॅव्हल्स’ कंपन्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन परिवहनमंत्री तथा ‘एसटी’ महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी केले. ते या अनुषंगाने ‘एसटी’ महामंडळाच्या मुख्यालयात बोलावलेल्या बैठकीमध्ये बोलत होते. या बैठकीला महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर आणि सर्व खाते प्रमुख यांच्यासह ‘खासगी टूर्स अ‍ॅण्ड ट्रॅव्हल्स’ संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
 
मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले की, “राज्यातील गोरगरीब जनतेला धार्मिक पर्यटनाचा आनंद लुटता यावा, यासाठी ‘खासगी टूर्स अ‍ॅण्ड ट्रॅव्हल्स’ कंपन्यांनी ‘एसटी’ महामंडळाच्या माध्यमातून कमी गर्दीच्या दिवसात सहलीचे आयोजन करावे. यासाठी पंढरपूरच्या धर्तीवर तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी भाविक पर्यटकांना स्वच्छतागृह आणि निवास व्यवस्था (जिथे उपलब्ध असेल तिथे) निःशुल्क उपलब्ध करून देण्यात येईल.
 
उत्पन्न वाढवण्याचा हेतू
 
मंत्री सरनाईक पुढे म्हणाले की, “कमी गर्दीच्या हंगामामध्ये विशेषतः सुट्ट्यांच्या दिवशी ‘एसटी’ला प्रवासी भारमान कमी असते. त्यामुळे उत्पन्न कमी मिळते. अशावेळी ‘एसटी’ने खासगी ‘टूर्स अ‍ॅण्ड ट्रॅव्हल्स’च्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेसाठी धार्मिक पर्यटनस्थळी सहली आयोजित केल्यास त्यातून ‘एसटी’ महामंडळाचे उत्पन्न वाढेल. तसेच, सर्वसामान्य प्रवाशांना किफायतशीर दरात पर्यटनचा आनंद लुटता येणार आहे.”
 
कमी गर्दीच्या दिवशी आणि मागणीनुसार
 
खासगी टूर्स आणि ट्रॅव्हल्स कंपन्यांनी ‘एसटी’ महामंडळाच्या संयुक्त विद्यमाने कमी गर्दीच्या दिवशी पर्यटकांच्या मागणीनुसार अष्टविनायक दर्शन, तुळजापूर-पंढरपूर-अक्कलकोट दर्शन, ज्योतिर्लिंग दर्शन, त्र्यंबकेश्वर-नाशिक दर्शन अशा धार्मिक सहलींचे आयोजन करावे. तथापि, या उपक्रमाची सुरुवात येत्या श्रावण महिन्यापासून करण्यात यावी, अशा सूचना मंत्री सरनाईक यांनी ‘एसटी’ प्रशासनाला दिल्या आहेत.
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0