पावसात वीज यंत्रणेपासून सतर्क राहण्याचे महावितरणचे आवाहन

16 Jun 2025 17:21:51


कल्याण : वादळी व संततधार पाऊस किंवा अतिवृष्टी, पूर परिस्थिती, झाडे व फांद्या कोसळल्याने तुटलेल्या वीजतारा, विजेची उपकरणे किंवा यंत्रणेमधील शॉर्टसर्कीट आदींमुळे वीज अपघाताची शक्यता असते. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सार्वजनिक व घरगुती वीजयंत्रणा, उपकरणांपासून सतर्क राहावे. तसेच पूर किंवा अतिवृष्टीमुळे कोणत्याही क्षणी प्रतिकूल स्थिती, धोका निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन खबरदारीचा उपाय म्हणून रोहित्रांचा वीजपुरवठा बंद ठेवण्यात येतो. अशा स्थितीत वीज ग्राहकांनी सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणने केले आहे.


कल्याण परिमंडलांतर्गत सर्वच मंडल कार्यालयांमध्ये चोवीस तास नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात आले आहेत. तर आपत्कालीन परिस्थितीत साधनसामग्री व मनुष्यबळासह सज्ज राहण्याचे निर्देश मुख्य अभियंता चंद्रमणी मिश्रा यांनी दिले आहेत. कल्याण परिमंडलातील कल्याण मंडल एक आणि दोनसाठी (कल्याण पूर्व व पश्चिम, डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर, शहापूर, टिटवाळा) ८८७९६२६१५१ हे नियंत्रण कक्षाचे क्रमांक ग्राहकांच्या तक्रारी व धोक्यांची सूचना देण्यासाठी उपलब्ध असल्याचे महावितरणकडून सांगण्यात आले आहे.


Powered By Sangraha 9.0