देहरादून : उत्तराखंडच्या रुद्रप्रयाग येथे रविवार, दि. १५ जून रोजी केदारनाथ मंदिराकडे जाणाऱ्या हेलिकॉप्टरच्या झालेल्या अपघातात सात जणांचा मृत्यू झाला. या अपघातात राज्यातील एका कुटूंबाचा सामावेश आहे. यात त्यांनी त्यांची दोन वर्षांच्या मुलगीही गमावली. त्यांचा मुलगा विवान आजोबांकडे राहत असल्याने तो एकमेव सदस्य बचावला.
रुद्रप्रयागमधील गौरीकुंडच्या जंगलात रविवार, दि. १५ जूनला पहाटे हेलिकॉप्टरचा भीषण अपघात झाला. हेलिकॉप्टरमध्ये सात प्रवासी होते. यात महाराष्ट्रातील राजकुमार जयस्वाल त्यांची पत्नी श्रद्धा आणि दोन वर्षांची मुलगी काशी यांचा अंत झाला आहे. विवानने आपले आई-वडिल आणि बहिणीला गमावले आहे.
विवान राज्यातील पांढरकवडा येथे त्याच्या आजोबांसोबत घरीच थांबला होता. जयस्वाल कुटुंब १२ जूनला यवतमाळच्या वणी येथून केदारनाथला दर्शनासाठी रवाना झाले. जयस्वाल कुटुंबासोबतच या हेलिकॉप्टरच्या दुर्घटनेत उत्तर प्रदेशच्या विनुद देवी आणि तुष्टी सिंग यांच्यासह हेलिकॉप्टरचा पायलट राजवीर सिंग चौहान आणि बद्रीनाथ-उत्तराखंड मंदिर ट्रस्टचे सदस्य विक्रम सिंग रावत यांचाही मृत्यू झाला आहे.
रुद्रप्रयाग जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी नंदन सिंह राजवार यांनी दिलेल्या माहीतीनुसार, अचानक खराब झालेल्या हवामानाच्या परीणामाने शून्य दृश्यमानतेतून हा अपघात झाला आहे. या हेलिकॉप्टरने गुप्तकाशीहून सकाळी ५:१० वाजता उड्डाण केले आणि श्री केदारनाथ हेलिपॅडवर सकाळी ५:१८ वाजता उतरले. दुसऱ्यावेळी जेव्हा पुन्हा या हेलिकॉप्टरने सकाळी ५:१९ वाजता गुप्तकाशीसाठी उड्डाण केले याच दरम्यान, गौरीकुंडजवळ हा अपघात झाला.
हेलिकॉप्टरच्या झालेल्या दु्र्घटनेनंतर रविवारी चारधाम यात्रा मार्गावरील सर्व हेलिकॉप्टर सेवा दोन दिवसांसाठी बंद करण्यात आल्याची घोषणा उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी केली आहे. यापूर्वीच्या दु्र्घटनेत ८ मे रोजी उत्तरकाशी जिल्ह्यातून गंगोत्री धाम येथे जाणारे हेलिकॉप्टर कोसळले होते ज्यामध्ये सहा जणांचा मृत्यू झाला होता. ७ जून रोजी केदारनाथला जाणाऱ्या एका हेलिकॉप्टरच्या उड्डाणानंतर लगेचच काही तांत्रिक बिघाडामुळे रस्त्यावर आपत्कालीन लँडिंग करावे लागले होते. ज्यात पायलट जखमी झाला परंतु त्यातील पाच प्रवाशांना सुरक्षितपणे वाचवण्यात यश आले होते.