
नवी दिल्ली : सामाजिक न्यायाचा दावा करणाऱ्या काँग्रेसच्या डीएनएमध्ये ओबीसीविरोध भरलेला आहे. त्यामुळे राजीव गांधी यांनी मंडल आयोगास संसदेत विरोध केला होता, त्याचप्रमाणे मंडल आयोगाच्या अहवालास लागू होण्यासाठी देशात जनता पक्षाचे सरकार सत्तेत यावे लागले होते. ओबीसी समुदायास कमकुवत करण्याचे काँग्रेस पक्षाचे धोरण राहिले असून आतादेखील राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष तेच धोरण पुढे रेटत आहे, असा आरोप केंद्रीय मंत्री भुपेंद्र यादव यांनी केला.
कर्नाटकमध्ये जात सर्वेक्षणासाठी काँग्रेसने १६५ कोटी रुपये खर्च केले होते, मात्र तो अहवालच रद्द करण्याचा निर्णय काँग्रेसने घेतला आहे. त्यामुळे कर्नाटकच्या जनतेच्या १६५ कोटी रुपयांचा चुराडा करण्यात आला आहे. कर्नाटकमध्ये काँग्रेस सरकारने सर्वेक्षणात लिंगायत आणि वोक्कलिंग या प्रमुख समुदायांची लोकसंख्या कमी दाखविली आहे तर मुस्लिमांची लोकसंख्या अधिक दाखवली आहे. त्याचप्रमाणे मुस्लिमांच्या सर्वच जातींना ओबीसी आरक्षणात आणण्यात आले आहे. त्यामुळे सामाजिक न्याय नव्हे तर लांगुलचालन हेच काँग्रेसचे धोरण असल्याचीही टिका केंद्रीय मंत्री यादव यांनी केली आहे.