इस्त्रायल इराण संघर्ष : इराणमध्ये भारतीय विद्यार्थ्यांना सुरक्षित स्थळी हलवले; परराष्ट्र मंत्रालयाने दिली माहिती

16 Jun 2025 16:15:08

नवी दिल्ली(Israel Iran War): इस्रायल-इराण युध्दाच्या पार्श्वभूमीवर इराण देशातील भारतीय विद्यार्थ्यांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने सोमवार, दि. १६ जून रोजी या संदर्भात अधिकृत घोषणा केली. इराणमधील भारतीय दूतावास कार्यालय विद्यार्थी आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी सक्रीयपणे कार्यरत आहेत. ते इराणमधील संभावित हल्ल्यांच्या ठिकाणापासून भारतीय विद्यार्थ्यांना सूरक्षित ठिकाणी स्थलांतरीत करत आहेत, अशी माहिती देण्यात आली.

दोन्ही देशांतील क्षेपणास्त्र हल्ले सलग तिसऱ्या दिवशीही सुरू असल्याने, हा जागतिक चिंतेचा विषय बनला आहे,युध्दजन्य परिस्थिती लक्ष्यात घेता तेथील भारतीयांच्या सुरक्षेतेची खबरदारी घेण्यात येत आहे. "परिस्थिती आणखी बिकट होऊ शकते म्हणून, दूतावास प्रत्येक गोष्टींवर बारकाईने लक्ष ठेवून आहे आणि भारतीय नागरिकांचे संरक्षण करण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करत आहे," असे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.

इराणमधील एकूण पंधराशे विद्यार्थ्यांना दूतावासाद्वारे सुरक्षित भागात हलवण्यात येत आहे. परराष्ट्र मंत्रालयाच्या अधिकृत निवेदनात म्हटले आहे, “काही प्रकरणांमध्ये विद्यार्थ्यांना दूतावासाच्या मदतीने इराणमधील सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित केले जात आहे. त्याच्या सुरक्षेसाठी इतर व्यवहारिक पर्याय तपासले जात आहेत,त्यासंदर्भात पुढील माहिती लवकरच मिळेल.” .

परराष्ट्र मंत्रालयाने पुढे सांगितले की, तेहरानमधील दूतावास सतत सुरक्षा परिस्थितीवर लक्ष ठेवत असून स्थानिक संयोजकांशी संपर्कात आहोत. छात्रवृत्ती किंवा आर्थिक बाबींच्या संदर्भातही काही विद्यार्थी अडकले आहेत. या संदर्भात आम्ही लवकरच विद्यार्थ्यांना मदत पोहचवू, शनिवारपासून इंटरनेट बंद असल्यामुळे संवादात अडचणी येत आहे, आणि काहींना तातडीने स्थलांतराची गरज असल्यामुळे आम्ही त्यांना लवकरच भारतामध्ये आणण्यासाठी उपाययोजना करत आहोत.



Powered By Sangraha 9.0