पालघर : वसई-विरारमधील गेल्या २० वर्षांतील बॅकलॉग भरून काढायचा असल्यास जसे विधानसभेत परिवर्तन केले तसेच महानगरपालिकेतही करावे लागेल, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. सोमवार, १६ जून रोजी वसई येथे आयोजित आ. स्नेहा दुबे पंडित यांच्या भाजप जनसंपर्क कार्यालयाच्या उद्धाटनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी पालकमंत्री गणेश नाईक, कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण, खासदार हेमंत सावरा, आ. निरंजन डावखरे, आ. राजन नाईक यांच्यासह इतर नेते उपस्थित होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "वसईसारख्या ऐतिहासिक गावाला छत्रपती शिवाजी महाराजांचा, मराठा साम्राज्याचा आणि हिंदवी स्वराज्याचा इतिहास आहे. याठिकाणी आज मोठ्या प्रमाणात विकास करण्याची आवश्यकता आहे. स्नेहाताईंचा संघर्षकन्या असा उल्लेख करता येईल. त्यांच्या नेतृत्वात या भागात एक मोठे परिवर्तन घडवायचे आहे. आम्ही सगळे पूर्ण ताकदीने त्यांच्या पाठीशी उभे आहोत. या पाच वर्षात गेल्या २० वर्षांतील बॅकलॉग भरून काढू," असे आश्वासन त्यांनी दिले.
"हा बॅकलॉग भरून काढायचा असल्यास जसे विधानसभेत परिवर्तन केले तसेच महानगरपालिकेतही करावे लागेल. तुमच्या परिवर्तनाची गुरुकिल्ली महानगरपालिकेत आहे. जोपर्यंत ती आपल्याकडे येत नाही तोपर्यंत आपण कितीही स्वप्न बघितली तरी ती त्या दरवाज्यात जाऊन थांबणार आहेत. ती पुढे जाऊ शकणार नाही. त्यामुळे जोरात कामाला लागा. महानगरपालिकेच्या दृष्टीने पूर्ण शक्तीनिशी उतरून परिवर्तन घडवा. त्यानंतर इथे काय परिवर्तन होते ते पाच वर्षे बघा," असे आवाहन त्यांनी केले आहे.
ते पुढे म्हणाले की, "महायूतीचे सरकार येणार याबद्दल आम्हाला खात्री होतीच. पण या सरकारमध्ये पालघर जिल्ह्यातील विशेषत: वसई, विरार, नालासोपारा या भागातील आमच्या सरकारमध्ये आपला प्रतिनिधी येणार की, नाही असा प्रश्न होता. तुम्ही सर्वांनी इतिहास घडवला आणि स्नेहाताई दुबे आणि राजन नाईक यांना निवडून देऊन क्रांती घडवली. या भागात कमळ फुलवले. इतक्या वर्षात लोकसभेत कमळ फुलायचे पण विधानसभेत कमळ तिकडेच राहायचे इकडे येत नव्हते, ही आमची आमची खंत होती. परंतू, आता इकडेही दोन कमळ फुलवले असून पुढचा मार्ग सुकर करण्याचे काम केले आहे," असेही ते म्हणाले.
...तर हीसुद्धा मुंबईसारखी सुनियोजित महापालिका असती!
"पालघर जिल्हा, वसई-विरार महानगरपालिका हा सगळा मुंबईचा विस्तारित असा भाग आहे. गेल्या अनेक वर्षात या भागात दाट लोकवस्ती निर्माण झाली. पण दुर्दैवाने ज्या वेगाने लोकवस्ती वाढली त्यामानाने नागरी सोयी आपण वाढवू शकलेलो नाही. आज हे क्षेत्र महानगरपालिकेचे असले तरी या क्षेत्रातील अनेक भागात गेल्यावर आपण शहरात आहोत की, खेड्यात आहोत असा प्रश्न पडतो. योग्यवेळी नागरिकरण व्यवस्थापित करण्यासाठी प्रयत्न झाले असते तर ही मुंबईसारखी सुनियोजित महानगरपालिका राहिली असती. पण दुर्दैवाने ती परिस्थिती पाहायला मिळत नाही," अशी खंतही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केली.