आमिर खानचं उशिराचं उत्तर: "पाहलगामवर हल्ला करणारे दहशतवादी मुसलमान नाहीत"

16 Jun 2025 18:11:58
aamir khan late reply the terrorists who attacked pahalgam are not muslims

नवी दिल्ली : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर अभिनेता आमिर खानने जवळपास आठवड्यानंतर प्रतिक्रिया दिली. भारत पाकिस्तान सीझफायरनंतर आणि भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत पाकच्या दहशतवादी तळांवर प्रत्युत्तर देणाऱ्या कारवाईनंतरच त्याचं वक्तव्य समोर आलं. मात्र, या वक्तव्याच्या काही तासांनंतरच 'सितारे जमीन पर' या आगामी चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यामुळे नेटिझन्सकडून त्याच्यावर टीकेची झोड उठली.

India TV ला दिलेल्या मुलाखतीत आमिर खानने यावर खुलासा केला. तो म्हणाला, "मी सोशल मीडियावर नाही. म्हणूनच माझं उत्तर उशिरा आलं. सोशल मीडियावर लोक लगेच प्रतिक्रिया देतात." तो पुढे म्हणाला, "हा हल्ला अत्यंत अमानुष होता. साध्या लोकांवर गोळ्या झाडणं ही भ्याडपणाची लक्षणं आहेत. त्यांनी आधी धर्म विचारला आणि नंतर गोळी झाडली. याचा अर्थ काय?"

चित्रपटाच्या ट्रेलर रिलीजआधीच प्रतिक्रिया दिल्यामुळे प्रचाराचा भाग असल्याचं आरोप झाल्यावर आमिर म्हणाला, "जर मी आपल्या सुरक्षा दलांबद्दल बोललो, तर त्यात चूक काय आहे? त्या क्षणी मी चित्रपटाचा विचार करावा की देशाच्या सुरक्षेचा? उलट, शांत राहणं चूक ठरलं असतं."

'सितारे जमीन पर' चा ट्रेलर ज्या दिवशी रिलीज झाला, त्याच दिवशी आमिरचं निवेदनही आलं. मात्र, तो म्हणतो, "हे केवळ योगायोग होतं. खरंतर ट्रेलर आधीच रिलीज होणार होता, पण देशावर हल्ला झाल्यामुळे मी तो थांबवला. त्याच दिवशी 'अंदाज अपना अपना' च्या पुन्हा प्रदर्शानाचा कार्यक्रमही मी रद्द केला."




इस्लाम धर्माच्या नावावर दहशतवादी हल्ले होणं खपवून घेता येणार नाही, असं म्हणत आमिर म्हणाला, "कोणताही धर्म निरपराधांना मारण्याची परवानगी देत नाही. स्त्रिया, लहान मुलं यांच्यावर हात उचलू नका, असं इस्लाम सांगतो. त्यामुळे मी अशा लोकांना मुसलमान मानत नाही."

याच मुलाखतीत आमिरने ज्येष्ठ अभिनेते मनोज कुमार यांनी दिलेल्या कौतुकाचा उल्लेख केला. "मनोजजी म्हणाले होते की मी देशभक्तीपर चित्रपटांची परंपरा पुढे नेत आहे. माझ्या कामातून माझं देशप्रेम दिसून येतं. 'रंग दे बसंती', 'लगान', 'सरफरोश' हे देशप्रेम जागवणारे चित्रपट आहेत. माझ्याइतके देशभक्तीपर चित्रपट इतर कोणत्याही अभिनेत्याने केले नसतील," असा दावा आमिरने केला.
Powered By Sangraha 9.0