सोलापूर : प्रणिती शिंदेंचे आरोप गंभीर नाहीत तर ते मनस्तापातून झालेल्या वेदना आहेत, असे प्रत्युत्तर पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिले आहे. सोमवार, १६ जून रोजी मंत्री जयकुमार गोरे यांनी सोमवार, १६ जून रोजी उजनी ते सोलापूर दुहेरी जलवाहिनीचे काम पूर्ण होऊन सोरेगाव येथील जलशुद्धीकरण केंद्रात पोहोचलेल्या पाण्याची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
सोलापूर-गोवा विमानसेवेवरून प्रणिती शिंदे यांनी काही आरोप केले होते. गोवा विमान सेवेमुळे तस्करी वाढणार नाही ना? असा सवाल त्यांनी उपस्थित केला होता. यावर बोलताना मंत्री जयकुमार गोरे म्हणाले की, "विरोधकांच्या हातात टीका करण्यापलीकडे काहीही राहिलेले नाही. त्यामुळे ते केवळ टीका करतात. परंतू, जे लोक प्रयत्न करतात त्यांना आपोआप श्रेय मिळते. ते घ्यावे लागत नाही. तर काही लोकांना आपल्या कार्यकाळात आपण हे करू शकलो नाही, अशी मनातून खंत असते. पण फक्त दु:ख वाटून, मनस्ताप करून आणि दुसऱ्यांना बोलून विषय संपणार नाही."
"प्रणिती शिंदेंचे आरोप गंभीर नाहीत तर ते मनस्तापातून झालेल्या वेदना आहेत. अपयश पचवण्याची क्षमता आणि झालेल्या कामाचे कौतूक करण्याची दानत आपल्यात असली पाहिजे. ती दानत विरोधकांनी ठेवावी, अशी माझी त्यांना विनंती आहे. मार्ग काढण्यासाठी केलेला प्रयत्न आणि श्रेय घेण्यासाठी केलेले प्रयत्न असे दोन प्रकारचे प्रयत्न असतात. भारतीय जनता पक्ष कधीही श्रेय घेण्याचे राजकारण करत नाही. निर्णायक काम करून श्रेय घेतले म्हणून कुणाला वाईट वाटण्याचे कारण नाही," असा टोलाही त्यांनी लगावला.