पर्यावरणप्रेमी सायकलस्वार

15 Jun 2025 21:54:40

‘सायकल चालवा, प्रदूषण टाळा’ असा संदेश देत, सायकलवरून १६ हजार किमी प्रवास करणार्या महेंद्र पोपट निकम यांच्याविषयी..

महेंद्र यांचा जन्म साताऱ्यातील माण तालुक्यातल्या कुळकजाई या गावात झाला. ते मूळचे सातारा जिल्ह्यातील चिंचणी या गावचे. त्यांना दोन बहिणी शोभा आणि रूपाली आणि आईवडील असे पाच जणांचे कुटुंब. वडील शेती करत, तर आई शकुंतला देखील वडिलांना शेतीच्या कामात मदत करत असत. महेंद्र हे लहान असतानाच वडिलांचे छत्र हरपले. त्यामुळे तेथूनच त्यांचा आजवरचा प्रवास जितका संघर्षमय, तितकाच प्रेरणादायी राहिला आहे. चिंचणी गावापासून तीन किमीवर त्यांची शाळा होती. शाळेत जाण्यासाठी एक पाण्याचा ओढा पार करून जावे लागे. हा प्रवास धोकादायक होता. महेंद्र यांच्या चुलत भावाचा हा ओढा ओलांडतानाच अपघाती मृत्यू झाला होता, या घटनेचा त्यांच्या आईने धसका घेतला. एकीकडे वडिलांचे छत्र हरपले. त्यात गावात शैक्षणिक सुविधा नसल्याने, महेंद्र यांच्या आईने त्यांना मामाकडे शिक्षणासाठी ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे त्यांचे संपूर्ण बालपण कुळकजाईमध्येच गेले.

त्यांचे सातवीपर्यंत प्राथमिक शिक्षण कुळकजाई येथील मराठी शाळेत झाले, तर पुढील दहावीपर्यतचे शिक्षण त्यांनी हायस्कूलमधून घेतले. १९९३ साली त्यांची दहावी झाली. दहावीच्या निकालानंतर डोळ्यांत स्वप्न घेत महेंद्र यांनी, मुंबईची वाट धरली.

मुंबई म्हटलं की तीन गोष्टी आठवतात, त्या म्हणजे ‘स्ट्रगल’, ‘सर्वाइवल’ आणि ‘सक्सेस’. महेंद्र यांनाही सुरुवातीला संघर्ष करावा लागला, त्यातूनच त्यांना पुढे यश मिळत गेले. सुरुवातीला मुंबईत त्यांनी टॅक्सी चालविण्याचे कामही केले. त्यानंतर ते दिवसा एका दुकानात काम करायचे आणि रात्री नवहिंद रात्र महाविद्यालयातून शिक्षण घेत असत. आठवड्यातून दोन दिवस कॉलेज सुटल्यावर, रात्री ११ ते १ टॅक्सी चालवत. असा जीवनाचा रात्रंदिवस संघर्ष सुरू होता. एकदा एका औषध कंपनीचे मालक दादर येथे, महेंद्र काम करत असलेल्या दुकानात खरेदीसाठी येत होते. त्यांची मुरबाड येथे एक कंपनी सुरू झाली होती. त्यांना तिकडे ये-जा करण्यासाठी ड्रायव्हरची गरज होती. महेंद्र यांना वाहन चालविता येत असल्याने, त्या मालकाकडे वाहन चालविण्याचे त्यांना काम मिळाले. त्यांची हळूहळू बँकेची कामेही ते करू लागले. या कामामुळे त्या मालकांचा महेंद्र यांच्यावरील विश्वास वाढला. मालकांना दररोज मुरबाड ये-जा करणे शक्य नव्हते. त्या कंपनीत दोन व्यवस्थापक होते. त्यातील एक व्यवस्थापक गावी गेला, तो दोन-तीन महिने परतलाच नाही. त्यामुळे मालकांनी महेंद्र यांना कंपनीत नोकरी दिली. ही महेंद्र यांच्या आयुष्याला कलाटणी देणारी सुखद घटना घडली.

महेंद्र सुरुवातीला निरीक्षक म्हणून काम करत होते. निरीक्षक म्हणून चार वर्षे त्यांनी काम केले. चांगल्याप्रकारे काम शिकून घेतल्याने महेंद्र यांना, सहाय्यक व्यवस्थापक म्हणून बढती मिळाली. त्यानंतर ते मुरबाडमध्येच स्थायिक झाले. एकीकडे कामाचा व्याप वाढला होता, पण शिक्षणाचा ध्यास त्यांना स्वस्थ बसू देत नव्हता. त्यामुळे त्यांनी पुढील शिक्षण घेण्याचे ठरविले. दरम्यान त्यांचा २००३ मध्ये त्यांचा विवाह झाला. त्यांना या प्रवासात पत्नी सविता यांचीही मोलाची साथ लाभली. त्यांना विश्रुती आणि तेजस अशी दोन मुले आहेत. दोन्ही मुले वैद्यकीय क्षेत्रातील संबंधित शिक्षण घेत आहे.

२० वर्षे नोकरी केल्यानंतर महेंद्र यांनी व्यवसायात पाऊल टाकले. ‘एमडी टेक सोल्युएशन’ नावाने त्यांनी मुरबाडमध्ये व्यवसाय सुरू केला असून, हा कन्वेयर मशीनचा व्यवसाय आहे. या मशीनचा उपयोग एखादी वस्तू किंवा उत्पादन, एका स्थानावरून दुसऱ्या स्थानावर नेण्यासाठी होतो. या उपकरणामुळे मनुष्यबळ कमी करता येते. त्यामुळे कर्मचार्यांचे वेतन आाणि रजा या गोष्टी टाळता येतात. कन्वेयर मशीनचा उपयोग मेडिकल, मेटल आणि फूड इंडस्ट्रीसाठी केला जातो. ‘एमडी टेक कंपनी’ ‘टेक्नोग्राफी इंडस्ट्री’ला या मशीनचे वितरण करते. नुकतेच ‘टेक्नोग्राफी कंपनी’च्या माध्यमातून त्यांनी चीनला पाच मशीन निर्यात केले.

महेंद्र यांना लहानपणापासूनच सायकल चालविण्याचे वेड होते. पण कामाच्या व्यापात सायकल चालविणे बंद झाले. दरम्यान त्यांचा मुलगा तेजस यालाम्, महेंद्र यांनी सायकल खरेदी करून दिली. त्यावेळी त्यांची राईड पाहून, महेंद्र यांनादेखील सायकल चालविण्याची इच्छा झाली. त्यांची मूळ आवड ते आता जोपासत आहेत. लॉकडाऊनच्या काळात ते ‘कल्याण सायकल समुह’शी जोडले गेले. या समुहामध्ये २०० सदस्य आहेत. सायकलच्या माध्यमातून महेंद्र विविध ठिकाणी प्रवास करतात. गेल्या पाच वर्षांत त्यांनी १६ हजार किमीचा प्रवास केला आहे. त्यामध्ये शिर्डी, दापोली आणि आता नुकताच पंढरपूर येथे प्रवास केला आहे. पंढरपूर प्रवासासाठी दि. १३ जून ते दि. १५ जून या कालावधीत २०५ किमीचा प्रवास त्यांनी, ११ तासांत पार केला. महेंद्र यांच्यासोबत त्यांचे दोन सहकारीही होते. दरम्यान त्यांनी ‘सायकल चालवा’, ‘नदीकिनारी कचरा टाकू नये’ अशी जनजागृतीही केली. दि. १४ ऑगस्टला ते आग्रा-रायगड असा प्रवास करणार आहेत. शिवाजी महाराजांनी आग्र्यातून सुटल्यावर केलेला प्रवास कसा होता, त्याच मार्गावरून त्यांचा हा प्रवास होणार आहे. महेंद्र यांनी ‘केडीएमसी’च्या अनेक सायकल स्पर्धांमध्ये सहभाग घेतला असून, त्यांच्या सायकल पॅशनसाठी त्यांना अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. अशा या पर्यावरणप्रेमीच्या पुढील वाटचालीसाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून हार्दिक शुभेच्छा.
Powered By Sangraha 9.0