राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मुक्त पत्रकारितेचा पुरस्कार करते!

15 Jun 2025 11:51:13

narad puraskar

मुंबई : "राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्य समाजासाठी प्रेरणादायी आहे. स्वतंत्र भारतामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने खऱ्या अर्थाने मुक्त पत्रकारितेचा पुरस्कार केला " असे प्रतिपादन द इंडियन एक्सप्रेस ग्रुपचे संचालक अनंत गोयंका यांनी केले. विश्व संवाद केंद्र, मुंबई आयोजित रौप्य महोत्सवी देवर्षी नारद पत्रकार सन्मान सोहळा २०२५ येथे ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर विश्व संवाद केंद्राचे प्रमुख सुधीर जोगळेकर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे वरिष्ठ पदाधिकारी राजाभाऊ मुळे, निबे ऑर्डनन्स अँड मेरीटाईम लिमिटेडचे गणेश निबे, एडलवाईस ग्रुपचे अध्यक्ष राशेस शहा, राज्यसभेचे संसद सदस्य मिलिंद देवरा आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना अनंत गोयंका म्हणाले की " आजच्या काळात पत्रकारितेचे स्वरूप बदलले आहे. खऱ्या अर्थाने तळागाळातील लोकांच्या जीवनाचे प्रतिबिंब आजच्या पत्रकारितेमध्ये आपल्याला बघायला मिळतं, हे चित्र आशादायी आहे."

दि. १४ जून रोजी, विश्व संवाद केंद्र मुंबई आयोजित रौप्य महोत्सवी देवर्षी नारद पुरस्कार सन्मान सोहळा २०२५, मुंबईच्या बीकेसी येथील नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या सभागृहात पार पडला. यावेळी वेगवेगळ्या समाज माध्यमांमध्ये काम करणाऱ्या माध्यमकर्मींचा सन्मान करण्यात आला. एकूण १० श्रेणीमध्ये पत्रकारांचा सन्मान करण्यात आला ज्यामध्ये सोशल मीडिया इन्फ्लुअन्सर्स पासून ते एक शतकाहून अधिक काळ कार्यरत असणाऱ्या वृत्तपत्र समूहाचा देखील सन्मान करण्यात आला. सोशल मीडियाच्या माध्यमातून अभिव्यक्त होणाऱ्या स्मिता पावसकर, अमोल जामदरे, जयेश गांगण, मृगा वर्तक यांचा यावेळी सन्मान करण्यात आला. पत्रकारितेच्या क्षेत्रात स्वतःचा वेगळा ठसा उमटवणारे जेष्ठ पत्रकार समीर कर्वे, संदीप रामदासी शैलेश गायकवाड यांचा देखील यावेळी सन्मान करण्यात आला. साप्ताहिक विवेकच्या संपादक अश्विनी मयेकर यांचा यावेळी विशेष गौरव करण्यात आला. बहुभाषिक वृत्तसंस्था हिंदुस्थान समाचार तसेच एक दशकाहून अधिक काळ पत्रकारितेच्या क्षेत्रात काम करणाऱ्या मुंबई समाचार या संस्थेचा सुद्धा सन्मान करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाच्या पूर्वार्धात पत्रकारिता आणि राष्ट्रवाद या चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते ज्यामध्ये राज्यसभेचे संसद सदस्य मिलिंद देवरा आणि इंडियन एक्सप्रेस ग्रुपचे संचालक अनंत गोयंका यांनी भाग घेतला.
 
सदर कार्यक्रमात आपले मनोगत व्यक्त करताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे वरिष्ठ पदाधिकारी राजाभाऊ मुळे म्हणाले की भारतीय विचार हा विश्वाच्या कल्याणाचा विचार कायम करत राहिला आहे. हा विश्वात्मक विचार आणि या विचाराचे चिंतन आपल्याला पत्रकारितेच्या क्षेत्रात सुद्धा बघायला मिळतं. अनुषंगाने निरपेक्ष निर्भीड पत्रकारांचा सन्मान करणं अत्यंत गरजेचे आहे. बदलता युगात पत्रकारितेचे बदलणारे स्वरूप, त्याचा समाजावर होणारा परिणाम, यावर मान्यवरांनी आपले मत व्यक्त केले व अत्यंत उत्साहात कार्यक्रम संपन्न झाला.

दहशतवादाविरोधात भारताची एकजूट!
पत्रकारिता आणि राष्ट्रवाद या चर्चासत्र दरम्यान आपली भूमिका मांडताना मिलिंद देवरा म्हणाले की " विविधते मधली एकता ही भारताची ओळखच नव्हे, तर हे भारताची ताकत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात जेव्हा सर्वपक्षीय शिष्टमंडळ ऑपरेशन सिंदूर आणि त्या अनुषंगाने भारताची भूमिका मांडण्यासाठी परदेशात गेले त्यावेळेला दहशतवादाविरोधातली भारताची एकजूट ही जगाच्या निदर्शनास आली."

समृद्ध परंपरेचे पाईक! - अश्विनी मयेकर, संपादक : साप्ताहिक विवेक
"संघ विचारांच्या सानिध्यात माझे बालपण गेले. त्याच विचारांच्या साप्ताहिक विवेक मध्ये काम करण्याचा मी निर्णय घेतला. विवेक मध्ये काम करत असताना आपण एका समृद्ध परंपरेचे पाईक आहोत हे जाणवले. ही जबाबदारी खरं तर खूप मोठी होती. या प्रवासामध्ये वेळोवेळी अनेक ज्येष्ठ लोकांचे मार्गदर्शन लाभले. या पुरस्कारासाठी विश्व संवाद केंद्राचे मनःपूर्वक आभार"

 
 
Powered By Sangraha 9.0