धक्कादायक! पुण्यातील इंद्रायणी नदीवरचा पूल कोसळला!
15 Jun 2025 18:58:35
पुणे(Bridge collapsed): मावळ तालुक्यातील कुंडमाळा परिसरात इंद्रायणी नदीवरील जुना लोखंडी पूल कोसळल्याने रविवार दि. १५ जून रोजी, मोठी दुर्घटना घडली आहे. या घटनेत २ जणांचा मृत्यू झाला असून, अनेकजण वाहून गेल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
दुर्घटना दुपारी ३.३० च्या सुमारास घडली. शनिवार आणि रविवारची सुट्टी असल्यामुळे या भागात पर्यटकांची मोठी गर्दी होती. जुना पूल अनेक पर्यटकांनी ओलांडत असताना तो अचानक तुटून नदीत कोसळला, आणि अनेकजण पाण्यात पडले, असून २० ते २५ जण वाहून गेल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
बचाव कार्य सुरू
तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्याचे अधिकारी म्हणाले की, “इंद्रायणी नदीतील पुलाचा काही भाग कोसळल्यामुळे एक जण वाहून गेल्याची माहिती आहे, तर आतापर्यंत तीन जणांना वाचवण्यात आले आहे.” घटनास्थळी एनडीआरएफ, पोलिस आणि अग्निशमन दल दाखल झाले असून शोध आणि बचाव मोहीम युद्धपातळीवर सुरू आहे.
या घटनेचा तांत्रिक तपास, पूलाच्या सुरक्षिततेचा दर्जा आणि दोषी यंत्रणांवर कारवाई यासाठी राज्य शासनाने विशेष चौकशी समिती स्थापन केली आहे.
मृत्यूंचा आकडा वाढण्याची शक्यता
“या दुर्दैवी घटनेत २ जणांचा मृत्यू झाला आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत”- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस