कुख्यात गुंड शाहरुख उर्फ अट्टी शेखचा एन्काउंटर

15 Jun 2025 17:49:47


पुणे : पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने शनिवारी मध्यरात्री सोलापूर जिल्ह्यातील लांबोटी गावाजवळ झालेल्या चकमकीत कुख्यात गुन्हेगार शाहरुख उर्फ अट्टी रहीम शेख (वय २३, रा. सोलापूर) याचा एन्काउंटर केला.

शाहरुख शेख हा पुणे आणि सोलापूर परिसरात खून, खंडणी, बेकायदेशीर शस्त्र बाळगणे, धमकी देणे अशा गंभीर गुन्ह्यांमध्ये सामील असणारा एक कुख्यात गुंड होता. अनेक पोलिस ठाण्यांमध्ये त्याच्याविरुद्ध गुन्ह्यांची नोंद असून, तो अनेक दिवसांपासून पोलिसांच्या रडारवर होता.

गुन्हे शाखा युनिट पाचच्या पथकाला अट्टी शेखच्या हालचालींबाबत गोपनीय माहिती मिळाल्यानंतर, पथक त्याला अटक करण्यासाठी लांबोटी गावाजवळ पोहोचले. पोलिसांनी शरण येण्याचे आवाहन केल्यावर शेखने गोळीबार केला, त्यानंतर पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ प्रत्युत्तरात गोळी झाडली.

या चकमकीत शेख गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने सोलापुरातील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला, अशी माहिती पोलिसांनी दिली.

घटनेनंतर गुन्हे शाखेचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून, घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला असून, या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
Powered By Sangraha 9.0