अहमदाबाद विमान अपघाताची सर्वोच्च न्यायालयाने दखल घेऊन कारवाई करावी!, डॉक्टरांचे मुख्य न्यायाधीशांना पत्र
15 Jun 2025 11:25:01
नवी दिल्ली(Ahmedabad Air Crash) : अहमदाबादमध्ये घडलेल्या एअर इंडिया फ्लाइट AI 171 च्या भीषण अपघातात गुरुवार, दि.१२ जून रोजी,२६५ व्यक्ती मृत्युमुखी पडले. जखमींचा आकडाही जास्त आहे. या अपघातावर सर्वोच्च न्यायालयाने स्वतःहून (सुओ मोटो) कारवाई करावी, अशी मागणी दोन डॉक्टरांनी भारताचे सरन्यायाधीश यांना लिहिलेल्या एका पत्रात केली आहे.या पत्रात त्यांनी पीडितांच्या कुटुंबांना त्वरित आणि सन्मानजनक भरपाई मिळावी यासाठी केंद्र सरकारला स्पष्ट निर्देश देण्याची विनंती केली आहे.
डॉ. सौरव कुमार आणि डॉ. ध्रुव चौहान यांनी त्यांच्या पत्रात २०१० मधील मंगळुरू विमान अपघाताशी संबंधित "त्रिवेणी कोडकणी विरुद्ध एअर इंडिया लिमिटेड" या प्रकरणातील सर्वोच्च न्यायालयाच्या २०२०च्या निर्णयाचा आधार घेतला आहे. त्या निर्णयात सर्वोच्च न्यायालयाने विमान अपघातग्रस्तांना भरपाई देताना वापरावयाची तत्त्वे स्पष्ट केली होती. त्यात प्रमुख मुद्दे असे होते:
1. उत्पन्नाचे आकलन: कंपणीच्या वार्षिक उत्पादनाचा आधार घेऊन अपघातग्रस्तांना भरपाई द्यावी. 2. भविष्यातील शक्यता: 40-50 वर्षे वयोगटातील कर्मचाऱ्यांसाठी भविष्यातील संभाव्य व्यक्तींसाठी 30% ची भरपाई. 3. गुणक व व्याज: योग्य गुणकनुसार भरपाई द्याव आणि भरपाई देण्यास उशीर झाला तर त्यावर 7.5% वार्षिक व्याज द्यावे. 4. गैर-आर्थिक नुकसान: मानसिक आघात व सामाजिक नुकसान याची स्वतंत्र भरपाई द्यावी.
डॉक्टरांनी म्हटले आहे की, जरी एअर इंडिया अपघाताची प्राथमिक जबाबदारी स्वीकारते, तरी मृत्यू व इजा झालेल्यांचे प्रमाण पाहता केंद्र सरकारकडून तातडीच्या हस्तक्षेपाची आवश्यकता आहे. विशेषतः बीजे मेडिकल कॉलेजचे निवासी डॉक्टर या दुर्घटनेत अपघाताग्रस्त आणि मृत्युमुखी पडले आहेत तर त्यांच्या कुटुंबाला भरपाई मिळावी यासाठी त्यांनी खालील मागण्या केल्यात, ते मागण्या खालीलप्रमाणे:
1. ₹५० लाख अंतरिम भरपाई: प्रत्येक पीडिताच्या कुटुंबाला केंद्र सरकारने तातडीने देण्याचे निर्देश 2. उच्चस्तरीय तज्ञ समिती: सर्वोच्च न्यायालयाच्या निरीक्षणाखाली नुकसानभरपाईचे मूल्यमापन करण्यासाठी 3. जलदगती दावा निपटारा: पीडित कुटुंबांना दीर्घकाळ खटले चालवावे लागू नयेत 4. रोजगार व पुनर्वसन: पीडित कुटुंबियांसाठी दीर्घकालीन मदत 5. अपघाताची सखोल चौकशी: कारणे शोधण्यासाठी व भविष्यातील अपघात रोखण्यासाठी पावले