जगातील सर्वात मोठी झोपडपट्टी

14 Jun 2025 12:08:14
 
world largest slum
 
आशियातील सर्वांत मोठी झोपडपट्टी म्हणजेच भारतातील धारावी असा एक सर्वसाधारण समज. मात्र, तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की, सर्वांत मोठी झोपडपट्टी ही भारतात नव्हे, तर पाकिस्तानातील कराचीमध्ये आहे. प्रगतिशील भारत आज विकासाच्या नव्या पाऊलखुणा उमटवीत असताना, भारताविरुद्ध अपप्रचार आणि अफवा पसरविणार्‍या शक्ती या गेली कित्येक वर्षे जागतिक पातळीवर भारताचे नाव खराब करण्यासाठी कार्यरत आहेत, हेच यावरून दिसून येते.
 
पाकिस्तानच्या कराचीमधील ओरंगी शहर हे आशियातील सर्वांत मोठी झोपडपट्टी. एका अहवालानुसार, 2030 सालापर्यंत अंदाज आहे की, 24 लाख झोपड्यांसह पाकिस्तानच्या कराचीमधील ओरंगी शहर हे सर्वांत मोठी झोपडपट्टी असेल, तर 12 लाख झोपड्यांसह मेक्सिकोमधील नेझा ही दुसरी जगातील दुसरी सर्वांत मोठी झोपडपट्टी असेल, यानंतर दहा लाख लोकसंख्येसह भारतातील धारावीचा क्रमांक येतो. मात्र, 2030 सालापर्यंत भारताच्या मुंबई येथील धारावी ही झोपडपट्टी ही नव्या टाऊनशिपसह पुनर्विकासाच्या मार्गावर असेल, असा अंदाज येथील वेगवान प्रकल्पांवरुन दिसून येतो. अशावेळी आता भारताची प्रतिमा मलीन करणार्‍या या धारावीच्या पर्यटनावरही निर्बंध आणणे आवश्यक झाले आहे.
 
रोजगाराच्या संधींच्या शोधात पाकिस्तनाच्या ग्रामीण भागातून कराचीकडे स्थलांतर सुरू झाले. यातूनच ओरंगी या शहराची झोपडपट्टी निर्मिती झाली. मूळतः शेतीविषयक कामांसाठी राखीव असलेला हा जमिनीचा एक तुकडा होता. मात्र, कालांतराने हा परिसर वाढत्या झोपड्यांनी व्यापला. लोकांनी पाणी, स्वच्छता आणि वीज यांसारख्या प्राथमिक, मूलभूत सुविधांचा अभाव असणारी वस्ती इथे उभी केली. पुरेशी घरे आणि आवश्यक सुविधा नसल्याने ओरंगी या शहरात झोपडपट्टी निर्माण झाली. अरुंद गल्ल्या, दाट लोकसंख्या असलेली, अपुरा पाणीपुरवठा आणि ड्रेनेज सिस्टम नसलेली स्वतंत्र घरे येथे उभी राहिली. आज ओरंगी झोपडपट्टी ही पाकिस्तानमधील अडचणींचे प्रतीक बनली आहे. 2016 साली संयुक्त राष्ट्रांनी कराचीला 12वे सर्वांत मोठे महानगर म्हणून घोषित केले. कराचीतील ओरंगी शहरामध्ये 99 टक्के मुस्लीम आहे.
 
याठिकाणी असलेला उच्च बेरोजगारी दर आणि कमी रोजगारामुळे बहुतेक रहिवासी भाग असुरक्षित आणि कमी दर्जाचे रोजगार देणार्‍या क्षेत्रांमध्ये येतात. दर्जेदार शिक्षणाचा अभाव या तरुणांना चक्रीय गरिबीतून बाहेर पडणे जवळजवळ अशक्य बनवतो. पुरेशा वैयक्तिक आणि नैसर्गिक स्वच्छतेचा अभाव, चांगल्या आरोग्य सुविधांचा अभाव यांमुळे ओरंगीला ‘साथरोगाचे माहेरघर’ म्हणूनच ओळखले जाते. ओरंगी शहरातील पाणीटंचाई ही सर्वांत मोठी समस्या. कराचीमध्ये तज्ज्ञांना असे आढळून आले की, येथील जलवाहिन्यांमध्ये अनेक रोगजन्य घटक आहेत. जगातील अनेक झोपडपट्ट्यांप्रमाणेच, ओरंगी टाऊनमध्येही घरांची मागणी पुरवठ्यापेक्षा तिप्पट असल्याने गृहनिर्मितीचे संकट आहे. ओरंगीच्या अनेक भागांत साधारणपणे आठ ते दहा लोक केवळ दोन बेडरूमच्या घरात राहतात. या गर्दीमुळे निर्माण होणारी कमी दर्जाचे राहणीमान, स्वच्छ पाण्यासारख्या सेवांचा अभाव यांमुळे कॉलरा आणि डेंग्यू ताप यांसारख्या आजारांचा वेगाने प्रसार होतो.
 
शिक्षणाचा अभाव आणि पुरेसे उत्पन्न, रोजगार नसल्याने ओरंगी टाऊनमध्ये गुन्हेगारी आणि हिंसाचाराचे प्रमाणही लक्षणीय आहे. अभ्यासातून असे दिसून आले आहे की, ओरंगी टाऊनमधील सामाजिक-आर्थिक मानकांमुळे महिलांवर किरकोळ गुन्हे आणि लैंगिक छळ होण्याची शक्यता जास्त असते. 2011 ते 2014 सालापर्यंत ओरंगी टाऊनमधील 77 टक्के महिला या बलात्काराच्या बळी ठरल्या आहेत. 1980 साली डॉ. अख्तर हमीद खान यांनी संपूर्ण प्रदेशातील गरिबीचे परिणाम कमी करण्याच्या उद्देशाने ‘ओरंगी पायलट प्रोजेक्ट’ची स्थापना केली. हा ‘ओरंगी पायलट प्रोजेक्ट’ आजपर्यंतच्या सर्वांत यशस्वी गैर-सरकारी संस्था प्रकल्पांपैकी एक बनला. मात्र, अकार्यक्षम सरकार आणि सातत्याने तणावपूर्ण वातावरण यामुळे समस्यांमुळे परिस्थिती निराशाजनक आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0