विक्रोळी उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून नवा पायंडा

14 Jun 2025 19:14:41

मुंबई, मुंबईतील पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणाऱ्या विक्रोळी रेल्वे स्थानकाजवळील उड्डाणपुलाचे बांधकाम पूर्ण झाले आहे.पावसाळ्याचे दिवस लक्षात घेता नागरिकांची गैरसोय होऊ नये या उद्देशाने कोणत्‍याही औपचारिक समारंभाची वाट न पाहता विक्रोळी पूल नागरिकांसाठी खुला करण्याचे आदेश मुख्‍यमंत्री फडणवीस यांनी महानगरपालिका प्रशासनास दिले आहेत. हे पाहता शनिवार,दि. १४ जून सायंकाळी ४ वाजेपासून विक्रोळी पूल वाहतुकीस खुला केला करण्यात आला.

पूर्व उपनगरातील विक्रोळी येथील रेल्वे मार्गावरून जाणाऱ्या उड्डाणपुलामुळे पूर्व-पश्चिम बाजू जोडली जाणार आहे. या पुलामुळे विक्रोळी पश्चिमेकडील लाल बहादूर शास्त्री मार्ग आणि विक्रोळी पूर्व बाजूस पूर्व द्रुतगती महामार्ग जोडले जाणार आहेत. परिणामी, प्रवास वेळेत सुमारे ३० मिनिटांची बचत होणार आहे. महानगरपालिकेच्या पूल विभागाच्या समन्वयाने विक्रोळी पुलाची उभारणी, स्थापत्य कामे व अनुषंगिक कामे देखील पूर्ण झाली आहेत. विक्रोळी रेल्वे स्थानकाजवळ रेल्वे मार्गावर उभारण्यात आलेल्या पुलाची एकूण रुंदी १२ मीटर तर लांबी ६१५ मीटर इतकी आहे. त्यापैकी ५६५ मीटरची उभारणी बृहन्मुंबई महानगरपालिकेने केली आहे. तसेच उर्वरित ५० मीटर लांबीपर्यंतची उभारणी मध्ये रेल्वेकडून करण्यात आली आहे. पुलाच्या दोन्ही बाजूचे पोहोच रस्ते, मार्गिकेवरील कॉंक्रिट, मास्टिक, ध्वनी रोधक, अपघातरोधक अडथळा, रंगकाम आणि मार्ग रेषा आखणी आदी सर्व कामे पूर्ण होऊन पूल वाहतुकीसाठी उपलब्‍ध झाला आहे. महानगरपालिकेच्‍या रस्ते आणि वाहतूक विभागाने पश्चिमेकडील बाजूवर वाहतूक थांबा क्षेत्र तयार केले आहे.

विक्रोळी येथील लालबहादूर शास्त्री मार्गापासून पूर्व द्रुतगती मार्गाला जोडणारा अत्यंत महत्त्वाचा ६१५ मीटरचा पूल मुंबई महानगरपालिकेने पूर्ण केला, त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन! मी मुख्यमंत्री असताना २०१८ मध्ये या कामाचे आदेश दिले होते. पावसाळ्याच्या कालावधीमध्ये लालबहादूर शास्त्री मार्गावर बऱ्याच वेळा वाहतूक कोंडी होते, नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागतो. ही बाब विचारात घेता कोणत्याही अधिकृत समारंभाची वाट न पाहता हा पूल नागरिकांसाठी खुला करण्याचा निर्णय मी, तसेच माझे सहकारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी घेतला आहे आणि तसे आदेश सुद्धा आम्ही बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त आणि पोलिसांना दिले आहेत.

- देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री



Powered By Sangraha 9.0