सामान्य तिकीट घेऊन फर्स्ट क्लासचा प्रवास करताय?; टीसी आकारणार दंड

14 Jun 2025 19:35:50

मुंबई,मध्य रेल्वेच्या उपनगरीय गाड्यांच्या प्रथम श्रेणी डब्यांमध्ये “केंद्रित तिकीट तपासणी मोहीम” राबविण्यात येणार आहे. अनेकदा प्रथम श्रेणी डब्यात सामान्य तिकीट घेऊन अथवा तिकीट ना काढता प्रवास करणाऱ्यांमुळे गर्दी होते. त्यातून अनेकदा वाद निर्माण होतात. हेच लक्षात घेता प्रथम श्रेणी तिकीट अथवा पास घेणाऱ्या प्रवाशांचा प्रवास अधिक सुरक्षित आणि सुकर करण्याच्या दृष्टीने मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने एक ठोस आणि निर्णायक पाऊल उचलले आहे. मध्य रेल्वे उपनगरीय गाड्यांच्या प्रथम श्रेणी डब्यांमध्ये “केंद्रित तिकीट तपासणी मोहीम” राबविण्याचा निर्णय घेतला आहे. ही मोहीम सोमवार,दि.१६ जूनपासून प्रभावीपणे सुरू होईल, अशी माहिती मध्य रेल्वेने दिली आहे.

प्रथम श्रेणी डब्यांमध्ये अनधिकृत प्रवासाच्या तक्रारी सातत्याने प्राप्त होत असल्याने मुंबई विभागाचे विशेष तिकीट तपासणी पथक आता रेल्वे सुरक्षा बल कर्मचाऱ्यांच्या समवेत पीक तासांमध्ये सर्व प्रथम श्रेणी डब्यांमध्ये टप्प्याटप्प्याने व संपूर्ण प्रवासादरम्यान तैनात करण्यात येणार आहे. ही टीम प्रत्येक गाडीच्या प्रवासात सर्व डब्यांची सखोल तपासणी करेल. अनधिकृत प्रवासी आढळल्यास त्यांच्यावर तत्काळ प्रवासातच दंड आकारण्यात येईल. दंड भरायला नकार दिल्यास, अशा प्रवाशांना पुढील स्थानकावर उतरवून तेथील तिकीट तपासणी कर्मचाऱ्यांकडे सोपवले जाईल व गरज भासल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती मध्य रेल्वेने दिली आहे. त्यामुळे सर्व प्रवाशांनी वैध तिकीट अथवा पास घेऊनच प्रवास करावा आणि तपासणी कर्मचाऱ्यांना सहकार्य करून सर्वांसाठी प्रवास सुलभ, न्याय्य आणि सुरक्षित करावा, असे आवाहन मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने केले आहे.

मोहिमेची वैशिष्ट्ये

- प्रथम श्रेणी प्रवाशांचे हक्क सुरक्षित ठेवणे

- उपनगरीय रेल्वे प्रवासातील भाडे प्रामाणिकतेला चालना

- सातत्यपूर्ण तपासणीद्वारे अनधिकृत प्रवासाला आळा

- एसी लोकल हेल्पलाईन तिकीट तपासणी उपक्रमाच्या यशाच्या पार्श्वभूमीवर



Powered By Sangraha 9.0