...तर आमचा नाईलाज! संदीप देशपांडेंचा उबाठा गटावर पलटवार

14 Jun 2025 12:30:28



मुंबई :
महाराष्ट्राच्या हितासाठी सगळ्या मराठी माणसांनी एकत्र आले पाहिजे, असे राजसाहेब म्हणाले होते. याचा आपल्या सोयीनुसार कुणी अर्थ काढत असेल तर त्याला आमचा नाईलाज आहे, असा पलटवार मनसे नेते संदीप देशपांडे यांनी उबाठा गटावर केला आहे. शनिवार, १४ जून रोजी राज ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

संदीप देशपांडे म्हणाले की, "राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मुंबईभर रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण या ध्येयधोरणावर महाराष्ट्र नवनिर्माण सेना चालते. फक्त आजच्याच दिवस नाही तर येणाऱ्या पूर्ण आठवड्यात महाराष्ट्रातील विविध ठिकाणी रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे."

अहमदाबाद अपघातातील मृतांच्या संख्येत वाढ! युद्ध पातळीवर शोधकार्य सुरु

"आमच्याकडून उबाठा गटाला एकत्रीकरणाचा कुठलाही प्रस्ताव दिला गेलेला नाही. महाराष्ट्राच्या हितासाठी सगळ्या मराठी माणसांनी एकत्र आले पाहिजे, असे राजसाहेब म्हणाले होते. याचा आपल्या सोयीनुसार कुणी अर्थ काढत असेल तर त्याला आमचा नाईलाज आहे. २०२५ मध्ये तरी आमच्याकडून कुठलाही यूतीचा प्रस्तावर गेलेला नाही. २०१४ ला आणि २०१७ मध्ये आम्ही प्रस्ताव दिला तेव्हा त्यांनी आमच्या पाठीत खंजीर खूपसून आम्हाला फसवले. त्यामुळे आता दुधाने जीभ भाजल्यामुळे आम्ही ताकही फुंकून पितो. आमच्याकडून कुठलाही प्रस्ताव दिलेला नाही," असे ते म्हणाले.

महाराष्ट्र म्हणजे फक्त उबाठा नाही!

"उबाठा गटाकडून माध्यमांना हाताशी धरून समज पसरवण्याचा सुरु असलेला प्रयत्न खोटा आहे. राजसाहेबांच्या मुलाखतीत राजकीयदृष्ट्या एकत्र यावे असे ते कुठेही म्हणाले नाहीत. महाराष्ट्राच्या प्रश्नांसाठी असे ते म्हणाले. महाराष्ट्र म्हणजे फक्त उबाठा गट नाही किंवा संजय राऊत, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे नाहीत. महाराष्ट्र म्हणजे इथे राहणारी तमाम मराठी जनता आहे. त्यामुळे परिभाषा बदलण्याचा प्रयत्न ते करत आहेत. महाराष्ट्र म्हणजे उबाठा असे त्यांना वाटते पण तसे नाही," अशी टीकाही त्यांनी केली.

ते पुढे म्हणाले की, "आता महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणून आम्ही संपूर्ण २२७ जागांचा आढावा घेतला आहे. तिथे कसे काम केले पाहिजे यासाठी आमच्या केंद्रीय समितीने जवळजवळ ८०० च्या वर बैठका घेतल्या आहेत. वॉर्डमध्ये कोण संभाव्य उमेदवार असू शकतात यासंदर्भात आमची तयारी सुरु आहे. यूती आणि आघाडी करायची का, करायची तर कुणासोबत करायची याचा सर्वस्वी निर्णय राजसाहेब घेतील," असेही संदीप देशपांडे यांनी स्पष्ट केले.



Powered By Sangraha 9.0