राज-उद्धव युतीला विराम! चर्चा थंडावली; कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम, ‘बॅनरबाज’ही गोंधळले

14 Jun 2025 19:58:53

मुंबई, महापालिका निवडणुकीपूर्वी उद्धव आणि राज ठाकरे एकत्र येतील, अशी वातावरणनिर्मिती केली जात असतानाच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांच्या भेटीमुळे युतीच्या चर्चांना अचानक ‘ब्रेक’ लागला आहे. दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये देखील संभ्रमाचे वातावरण असून, स्थानिक पातळीवर सुरू असलेल्या युतीपूर्व हालचाली थंडावल्या आहेत.

दि. १२ जून रोजी सकाळी मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यात तब्बल एक तास चाललेली चर्चा केवळ औपचारिक नव्हती, हे राजकीय वर्तुळाने हेरले. या बैठकीत काय घडले, याबाबत कुठलाही अधिकृत खुलासा करण्यात आलेला नसला, तरी त्यानंतर अवघ्या काही तासांतच राज-उद्धव युतीच्या चर्चांचा सूरच मवाळ झाला. या भेटीनंतर ना राज ठाकरे यांनी युतीसंदर्भात कोणतेही सकारात्मक संकेत दिले, ना उद्धव ठाकरेंनी. किंबहुना 'सकाळच्या भोंग्याने' नेहमीसारखे प्रहार केले नाहीत, आणि स्थानिक पातळीवरील समन्वयाचे प्रयत्नही अचानक थांबले. त्यामुळे फडणवीस-राज भेट ही एकप्रकारे ‘राजकीय ब्रेक मीटिंग’ ठरली, अशी चर्चा सुरू झाली आहे.

दरम्यान, १३ जूनला आदित्य ठाकरे आणि १४ जूनला राज ठाकरे यांचा वाढदिवस असतो. यंदा ‘ठाकरे विरुद्ध ठाकरे’ नव्हे, तर ‘ठाकरे + ठाकरे’ अशी चर्चा सुरू असल्यामुळे, शिवसेना भवन आणि राज ठाकरेंच्या निवासस्थानाबाहेर काका-पुतण्याचे एकत्र फोटो असलेले बॅनर झळकले. काही ठिकाणी ‘राजदित्य’ अशीही नवकल्पना पोस्टरवर उमटली. मात्र, आदित्यच्या वाढदिवसाच्या आदल्या दिवशीच फडणवीस-राज भेट झाल्याने उबाठा गटाच्या कार्यकर्त्यांच्या उत्साहावर अक्षरशः पाणी फिरले.

सकाळचा भोंगा शांत

राजकीय घडामोडींवर बेधडक भाष्य करणारा उबाठा गटाचा ‘सकाळचा भोंगा’ देखील फडणवीस-राज ठाकरे भेटीनंतर अचानक शांत झाला. अन्यथा अशा भेटींवर उपरोधिक, तिरकस आणि स्फोटक प्रतिक्रिया भोंग्यातून उमटत असतात. या मौनाआड राजकीय सावधपणा आहे की अंतर्गत संभ्रम? हे गुलदस्त्यात असले तरी, उबाठाच्या गोटातील अस्वस्थता स्पष्ट आहे. मुंबई, ठाणे, पुणे आणि नाशिकमध्ये दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये सुरू असलेले ‘मैत्रीपूर्ण संवाद’ही याच दरम्यान थांबले. काही ठिकाणी नियोजित कार्यक्रम देखील रद्द करण्यात आल्याने कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.



Powered By Sangraha 9.0