आपत्कालीन हेल्पलाईन मोठ्या फलकांवर लावा - दिव्या ढोले यांचे मुंबई महापालिका आयुक्तांना निवेदन
14 Jun 2025 20:13:50
मुंबई, पावसाळ्यात आपत्कालीन मदतीसाठी मनपाचे टोल फ्री क्रमांक मुंबईतील रस्ते व रेल्वे स्थानक, बस स्थानक, शाळा-महाविद्यालय परिसर येथे मोठ्या फलकांवर प्रदर्शित करण्यात यावी अशी मागणी भाजप नेत्या दिव्या ढोले यांनी मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा भूषण गगराणी यांच्याकडे केली आहे. दिव्या ढोले यांनी शुक्रवार, दि.१३ रोजी मुंबई महानगरपालिका मुख्यालय येथे महापालिका आयुक्त गगराणी यांची भेट घेऊन याबाबतचे निवेदन दिले.
दिव्या ढोले यांनी आपल्या निवेदनात नमूद केले की, मनपा प्रशासनाकडून घोषित करण्यात येणारे हे टोल फ्री क्रमांक हे मनपाच्या अधिकृत एक्स अकाऊंट, बेवसाईटवर प्रसिध्द करण्यात येतात. परंतू बऱ्याच सामान्य नागरिकांपर्यंत हे टोल फ्री क्रमांक वेळेत पोहचत नसल्याने या टोल फ्री क्रमांकाबाबत त्यांना कोणतीच माहिती नसल्याची बाब माझ्या निदर्शनास आली आहे. यावर उपाययोजना करण्याच्या अनुषंगाने हे टोल फ्री क्रमांक हे मनपा प्रशासनाच्या हद्दीतील रेल्वे स्थानक, बस स्थानक, शाळा-महाविद्यालयांच्या परिसरात मोठया होर्डिंगवर/फलकावर तसेच बेस्टच्या बसेसवर प्रदर्शित केल्यास ते सर्वसामान्य नागरिकांपर्यंत सहज व सुलभरित्या पोहचू शकतात व त्याचा नागरिकांना खऱ्या अर्थाने फायदा होवू शकेल. कारण मदतीचा एक फोन कॉल अनेकांचे प्राण वाचवू शकतो कारण प्रतिबंध हेच उपाययोजनेचे पहिले पाऊल आहे, अशी विनंती निवेदनाद्वारे दिव्या ढोले यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.