राज्यात रक्तसाठ्याचे ‘स्मार्ट मॅनेजमेंट’ - 'नो शॉर्टेज, नो वेस्टेज' धोरण आणणार; आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांची घोषणा

14 Jun 2025 18:37:27

मुंबई, प्रत्येक गरजू रुग्णाला वेळेत रक्त मिळावे आणि संकलित रक्ताचा गैरवापर किंवा नासाडी टळावी, यासाठी राज्यातील रक्तसंकलन आणि वितरण व्यवस्थेत मोठे बदल केले जाणार आहेत. रक्ताचा एक थेंबही वाया जाऊ नये, या उद्देशाने राज्यात ‘नो शॉर्टेज, नो वेस्टेज’ हे धोरण तातडीने तयार करावे, असे निर्देश आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले आहेत. सामान्य रुग्ण, अपघातग्रस्त, थॅलेसेमिया किंवा अन्य गंभीर आजारांनी ग्रस्त रुग्णांसाठी हा निर्णय दिलासादायक ठरणार आहे.

आरोग्य भवन येथे पार पडलेल्या राज्य रक्त संक्रमण परिषदेच्या आढावा बैठकीत आबिटकर यांनी सांगितले की, "स्वातंत्र्यदिन, प्रजासत्ताक दिन, तसेच नेत्यांच्या वाढदिवसानिमित्त मोठ्या प्रमाणात रक्तदान शिबिरे आयोजित केली जातात. त्या काळात रक्ताची मागणी नसल्यास मोठ्या प्रमाणात रक्त वाया जाण्याचा धोका असतो. उलट उन्हाळ्यात किंवा सणासुदीच्या काळात शिबिरांची संख्या घटते आणि तुटवडा जाणवतो. या असंतुलनावर उपाय म्हणून ‘नो शॉर्टेज, नो वेस्टेज’ हे धोरण उपयुक्त ठरणार असून, राज्यातील सर्व रक्तपेढ्यांमधील समन्वय, गरजेनुसार पुनर्वाटप, आणि काळजीपूर्वक नियोजन यावर भर दिला जाणार आहे.

आरोग्यमंत्र्यांनी दिलेले निर्देश

• राज्यात नवीन रक्तपेढ्या उभारण्यासाठी ‘ना-हरकत प्रमाणपत्र’ देण्याची नवी नियमावली तयार करावी

• शासकीय रक्तपेढ्यांमध्ये नॅट (न्यूक्लिक अॅसिड टेस्ट) तपासणी सुरू करण्याच्या शक्यतांचा अभ्यास अहवाल तयार करावा

• नवी मुंबई, खारघर येथील रक्त संक्रमण परिषदेचे कार्यालय आणि प्रशिक्षण केंद्र तातडीने सुरू करावे





Powered By Sangraha 9.0