आषाढवारीत आपत्कालीन स्थिती हाताळण्यासाठी ‘एनडीआरएफ’ पथक

14 Jun 2025 16:36:14

मुंबई, आषाढवारी निमित्ताने इंद्रायणी नदी पात्रात मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होत असते. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून राज्य आपत्ती प्रतिसाद दलाचे (एसडीआरएफ) एक पथक देहु येथे आणि राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे (एनडीआरएफ) एक पथक आळंदी येथे तैनात करण्याच्या सूचना राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून देण्यात आल्या आहेत.

राज्यात पाऊस पुन्हा सक्रीय झाल्यामुळे अतिवृष्टी आणि संभाव्य पूर परिस्थितीबाबत उपाय योजना म्हणून एनडीआरएफ, एसडीआरएफ पथकांना आपत्कालीन परिस्थितीत सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. राज्यात मागील २४ तासांमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वाधिक ७०.३ मिमी पाऊस झाला. रत्नागिरी जिल्ह्यात ४५ मिमी, मुंबई शहर २५.४, पुणे २३.८ आणि रायगड जिल्ह्यात २० मिमी पावसाची नोंद झाली.

कुठे किती पाऊस? (मिलिमीटरमध्ये)

ठाणे ३.४,रायगड २०, रत्नागिरी ४५, सिंधुदुर्ग ७०.८, पालघर ०.२, नाशिक १०.५, धुळे २.२, नंदुरबार ४.६, जळगाव ४.८, अहिल्यानगर ५.५, पुणे २३.८, सोलापूर ५.९, सातारा ८.८, सांगली २.६, कोल्हापूर ७, छत्रपती संभाजीनगर १६.७, जालना ७.८, बीड ७.६, लातूर २, धाराशिव ९.५, नांदेड ०.६, परभणी ०.७, हिंगोली ०.८, बुलढाणा २.७, अकोला ३, वाशिम १.८, अमरावती ०.६, यवतमाळ ०.८, नागपूर २.४, भंडारा ३.४, गोंदिया १.१, चंद्रपूर ०.४ आणि गडचिरोली ०.२.

दोन व्यक्ती, तीन प्राण्यांचा मृत्यू

- अहिल्यानगर जिल्ह्यात वीज पडून दोन प्राण्यांच्या मृत्यू, नाशिक जिल्ह्यात वीज पडून एका प्राण्याचा मृत्यू, पुणे जिल्ह्यात वीज पडून एक व्यक्ती मृत्यू आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात भिंत पडून एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.

- रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूरमधील अडीवरे गावात अतिवृष्टीमुळे पूर परिस्थिती निर्माण होऊन पुलावरुन पाणी वाहत होते. स्थानिक प्रशासनाकडून वाहतुक बंद करण्यात आली होती. याबाबत स्थानिकांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

- ठाणे जिल्ह्यातील तुर्भे एमआयडीसी येथे जनरेटरच्या धुरामुळे ग्रस्त झालेल्या २८ लोकांपैकी २६ व्यक्तींना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले असून दोन व्यक्ती रुग्णालयात उपचार घेत असल्याचे राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून कळविण्यात आले आहे.



Powered By Sangraha 9.0