नवी मुंबईत जागतिक विद्यापीठांची मुहूर्तमेढ

14 Jun 2025 14:22:04

mumbai edu city



नवी मुंबई, दि.१४ : प्रतिनिधी 
'मुंबई रायजिंग - क्रिएटिंग ॲन इंटरनॅशनल एज्युकेशन सिटी' या महाराष्ट्र सरकारच्या उपक्रमाअंतर्गत, पाच जागतिक स्तरावर प्रसिद्ध परदेशी विद्यापीठांना मुंबई आणि नवी मुंबईत त्यांच्या कॅम्पसची स्थापना करण्यासाठी अधिकृत इरादापत्रेप्रदान केली जाणार आहेत. यामध्ये अ‍ॅबर्डीन विद्यापीठ, यॉर्क विद्यापीठ, वेस्टर्न ऑस्ट्रेलिया विद्यापीठ, इलिनॉय इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी आणि इस्तितुतो यूरोपीओ दी डिझाईन या विद्यापीठांचा समावेश आहे. हे इरादापत्र प्रदान समारंभ आज शनिवार, दि. १४ जून रोजी ताज महाल पॅलेस हॉटेल, मुंबई येथे आयोजित करण्यात आला होता.

या कार्यक्रमाला केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.  या समारंभात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची देखील उपस्थिती होते.

महाराष्ट्र सरकारच्या मार्गदर्शनाखाली, सिडकोमार्फत उभारल्या जाणाऱ्या या आंतरराष्ट्रीय एज्युसिटीमुळे संपूर्ण भारतातील विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाच्या शिक्षणाची संधी मिळणार असून, हे शिक्षण विविध संस्कृतींच्या आदान-प्रदानाला चालना देईल आणि विविध पार्श्वभूमीतील विद्यार्थी व प्राध्यापकांमध्ये सहकार्य व संवाद वाढवेल. भारतामध्येच आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण उपलब्ध करून देणे आणि परदेशी विद्यापीठांचे कॅम्पस महाराष्ट्रात स्थापन करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.

आंतरराष्ट्रीय एज्युकेशन सिटी प्रकल्पाच्या अंतर्गत, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या ५ किलोमीटर परिसरात टॉप १० परदेशी विद्यापीठांचे कॅम्पस उभारण्याचे नियोजन आहे. ही देशातील पहिली अशा प्रकारची आंतरराष्ट्रीय एज्युकेशन सिटी ठरणार आहे. हा प्रकल्प नवी मुंबई व मुंबईला जागतिक शैक्षणिक केंद्र म्हणून ओळख मिळवून देईल आणि महाराष्ट्र राज्याचे एक ट्रिलियन अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट व भारताचे पाच ट्रिलियन अर्थव्यवस्थेचे आर्थिक लक्ष्य २०२९ पर्यंत साध्य करण्यासाठी एक महत्त्वाचा घटक ठरेल, असे सिडकोने सांगितले आहे.
Powered By Sangraha 9.0