नवी दिल्ली : (Iran Strikes 150 Missiles on Israel) इस्रायलने शुक्रवारी दि. १३ जून रोजी पहाटे इराणवर हवाई हल्ला केल्यानंतर रात्री इराणनेही इस्रायलवर मोठा हल्ला करत चोख प्रत्युत्तर दिले आहे. इराणने या हल्ल्यात इस्रायलमधील अनेक शहरांवर शेकडो बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागली. इराणने या प्रत्युत्तरात्मक कारवाईला 'ऑपरेशन ट्रू प्रॉमिस 3' असे नाव दिले आहे. यामध्ये प्रामुख्याने तेल अवीव व जेरुसलेम या दोन मोठ्या शहरांना लक्ष्य करण्यात आले आहे. इराणी लष्कराने इस्रायलवर १५० हून अधिक क्षेपणास्त्रे डागल्याचे वृत्त इस्रायलमधील एका वृत्तपत्राने प्रसिद्ध केले आहे.
या हल्ल्याविषयी इराणच्या लष्कराकडून निवेदन जारी करण्यात आले आहे. इराणच्या इस्लामिक रिव्हॉल्यूशनरी गार्डने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, त्यांनी इस्रायलमधील 'लष्करी केंद्र आणि हवाई तळांसह डझनभर ठिकाणांवर' हल्ला केला आहे. या ऑपरेशनची अधिक माहिती नंतर दिली जाईल, असेही निवेदनात म्हटले आहे. दरम्यान, इस्रायली राष्ट्रीय रुग्णवाहिका सेवेने म्हटलं आहे की, तेल अवीव महानगर क्षेत्रात किमान पाच लोक जखमी झाले आहेत आणि त्यांना रुग्णालयात नेण्यात येत आहे.
नेमकं काय घडलं?
इस्रायलमध्ये शुक्रवारी मध्यरात्री अचानक सायरन वाजू लागले. तेल अवीव शहरातील नागरिकांनी आकाशात अनेक क्षेपणास्त्रे पाहिली. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. इराणी लष्कराने रात्री दोन वेळा इस्रायलवर बॉम्बहल्ला केला. इस्रायली लष्कराशी संबंधित नऊ ठिकाणे प्रभावित झाल्याचं इस्रायलमधील एका वृत्तपत्राने म्हटले आहे. यामध्ये आतापर्यंत १५ जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मात्र, यापैकी काहीजण किरकोळ जखमी असल्याचे सांगितले जात आहे.
या हल्ल्यानंतर इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामनेई यांनी एक्सवर एक व्हिडीओ जारी करत इस्रायलला इशारा दिला आहे. यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, "झायोनिस्ट राजवटीने मोठी चूक केली आहे. मात्र, ईश्वराच्या कृपेने आता त्यांची राजवट उध्वस्त होईल इराणी राष्ट्र आपल्या शहीदांचे रक्त वाया जाऊ देणार नाही. तसेच इराणच्या हवाई क्षेत्राच्या उल्लंघनाकडेही दुर्लक्ष करणार नाही. आमचे सशस्त्र दल सुसज्ज आहे आणि आमची जनता सशस्त्र दलांच्या पाठिशी आहे."