अहमदाबाद अपघातातील मृतांच्या संख्येत वाढ! युद्ध पातळीवर शोधकार्य सुरु

14 Jun 2025 11:53:53


गांधीनगर :
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांच्या संख्येत वाढ होऊन हा आकडा आता २७४ वर पोहोचल्याची माहिती पुढे आली आहे. तसेच विमानाच्या मागच्या भागात आणखी एक मृतदेह आढळला असून विमानाचा ढिगारा काढण्याचे काम युद्ध पातळीवर सुरु आहे.

गुरुवार, १२ जून रोजी अहमदाबाद येथे झालेल्या एअर इंडियाच्या विमान अपघातात २६५ जणांचा मृत्यू झाला होता. मात्र, आता यामध्ये आणखी वाढ झाली आहे. बी. जे. मेडिकल कॉलेजमधील काही डॉक्टर आणि विद्यार्थ्यांचे मृतदेह सापडल्याची माहिती पुढे आली असून मृतांचा आकडा २७४ वर पोहोचला आहे.

मृतांमध्ये डॉक्टर आणि त्यांचे नातेवाईक आणि काही स्थानिक नागरिकांचाही समावेश आहे. तसेच विमानाच्या मागच्या भागातही आणखी एक मृतदेह आढळला आहे. घटनास्थळी एनडीआरएफकडून शोधकार्य सुरु आहे. यासोबतच विमानाचे अवशेष हटवण्याचे काम युद्ध पातळीवर सुरु आहे.

अहमदाबादमधून लंडनसाठी निघालेले एअर इंडियाचे विमान उड्डाणानंतर काही मिनिटांतच मेघानीनगर परिसरात असलेल्या बी. जे. मेडिकल कॉलेजच्या वसतीगृहावर कोसळले. विमान कोसळल्यानंतर घटनास्थळी मोठ्या प्रमाणात आगीचे आणि धुराचे लोट उठले होते. हा अपघात इतका भीषण होता की, मृतदेहांची ओळख पटवण्यातही अडचण येत आहेत. दरम्यान, आता मृतांची आणि त्यांच्या नातेवाईकांची डीएनए चाचणी करून त्यांच्याकडे मृतदेह सोपवण्यात येत आहेत.




Powered By Sangraha 9.0