
अमरावती : गेल्या सात दिवसांपासून सुरु असलेल्या प्रहार पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांच्या अन्नत्याग आंदोलनाला शुक्रवार, १३ जून रोजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी भेट दिली. यावेळी बच्चू कडू यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी फोनवरून संवादही साधला.
याप्रसंगी आ. उमेश यावलकर, आ. प्रताप अडसड, अमरावतीचे भाजप जिल्हाध्यक्ष रविराज देशमुख, प्रदेश सचिव जयंत डेहनकर, महिला मोर्चाच्या छायाताई दंडाले, प्रवक्ते शिवराय कुलकर्णी, विभागीय आयुक्त श्वेता सिंगल, जिल्हाधिकारी आशीष येरेकर यांच्यासह भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह शेतकरी बांधव उपस्थित होते.
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी अमरावती जिल्ह्यातील गुरुकुंज मोझरी येथए बच्चू कडूंचे अन्नत्याग आंदोलन सुरु आहे. दरम्यान, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांची आंदोलनस्थळी भेट घेतली. यावेळी त्यांनी सरकारकडे केलेल्या मागण्यांबाबत सकारात्मक चर्चा झाली. यादरम्यान, बच्चू कडू यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधला. यावेळी बच्चू कडू यांनी आपले आंदोलन मागे घेण्याची विनंती करण्यात आली. दरम्यान, शनिवारी ते आंदोलन मागे घेतील असे त्यांनी सांगितल्याचे मंत्री बावनकुळेंनी सांगितले.
बैठकीत काय चर्चा? बच्चू कडू यांनी सरकारकडे केलेल्या १७ पैकी १५ मागण्यांवर येत्या मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा करण्यात येईल. शेतकरी कर्जमाफीसंदर्भात लवकरच उच्चस्तरीय समिती नेमली जाईल. दिव्यांग बांधवांच्या अनुदान वाढीसंदर्भात विधिमंडळाच्या येणाऱ्या अधिवेशनात आर्थिक तरतूद वाढवून देऊ, या मुद्दांवर यावेळी चर्चा झाली.