नवी दिल्ली, अहमदाबादहून गॅटविक विमानतळावर (लंडन) जाणाऱ्या एअर इंडियाच्या फ्लाईट एआय-१७१ च्या अपघातामागील कारणांची तपासणी करण्यासाठी सरकारने एक उच्चस्तरीय बहु-विद्याशाखीय समिती स्थापन केली आहे, ही समिती ३ महिन्यात आपला अहवाल सादर करणार आहे.
१२ जून २०२५ रोजी अहमदाबादहून गॅटविक विमानतळावर (लंडन) जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमान अल-१७१ च्या अपघातामागील कारणांची तपासणी करण्यासाठी एक उच्चस्तरीय बहु-विद्याशाखीय समिती स्थापन करण्यात आली आहे. ही समिती अशा घटना रोखण्यासाठी आणि हाताळण्यासाठी जारी केलेल्या विद्यमान मानक कार्यपद्धती (एसओपी) आणि मार्गदर्शक तत्त्वांची तपासणी करेल आणि भविष्यात अशा घटनांना तोंड देण्यासाठी व्यापक मार्गदर्शक तत्त्वे सुचवेल, असे नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे.
ही समिती संबंधित संस्थांद्वारे केल्या जाणाऱ्या इतर चौकशींना पर्याय म्हणून काम करणार नसून भविष्यात अशा घटना रोखण्यासाठी आणि हाताळण्यासाठी एसओपी तयार करण्यावर लक्ष केंद्रित करेल, असे आदेशात स्पष्ट केले आहे. समितीला सर्व नोंदी उपलब्ध असतील, ज्यामध्ये फ्लाइट डेटा, कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर, विमान देखभाल रेकॉर्ड, एटीसी लॉग आणि साक्षीदारांच्या साक्षीचा समावेश असेल, असे त्यात म्हटले आहे. समिती तीन महिन्यांत आपला अहवाल प्रकाशित करेल असे त्यात म्हटले आहे.
आदेशानुसार, समितीमध्ये गृह सचिव आणि गृह मंत्रालयाचे सचिव किंवा सहसचिव, नागरी विमान वाहतूक सचिव, गुजरात गृह विभागाचे प्रतिनिधी, राज्य आपत्ती प्रतिसाद प्राधिकरणाचे प्रतिनिधी, अहमदाबादचे पोलिस आयुक्त, भारतीय हवाई दलाचे महासंचालक (डीजी), निरीक्षण आणि सुरक्षा, नागरी विमान वाहतूक सुरक्षा ब्युरोचे महासंचालक, नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाचे महासंचालक, गुप्तचर ब्युरोचे विशेष संचालक (आयबी), न्यायवैद्यकीय विज्ञान सेवा संचालनालयाचे संचालक यांचा समावेश असेल.
ब्लॅकबॉक्सचे विश्लेषण महत्त्वाचे ठरणार – राममोहन नायडू किंजारापू, केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री
केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री राममोहन किंजारापू नायडू यांनी शनिवारी पत्रकारपरिषदेस संबोधित केले. यावेळी ते म्हणाले, ढिगाऱ्यातून ब्लॅक बॉक्स शोधणे हे तपास प्रक्रियेसाठी महत्त्वाचे आहे. त्यासाठी विमान अपघात तपास ब्युरोला (एआयबी) ताबडतोब कामाला लावण्यात आले. एएआयबी मार्फत होत असलेल्या तांत्रिक तपासामध्ये गुरुवारी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास घटनास्थळावरून ब्लॅक बॉक्स सापडला. त्याचे सखोल विश्लेषण केल्यावर अपघाताच्यादरम्यान किंवा अपघातापूर्वीच्या काही क्षणांमध्ये काय घडले असेल याची सखोल माहिती मिळेल, असे केंद्रीय मंत्री नायडू यांनी सांगितले.