बच्चू कडू यांचे उपोषण मागे

14 Jun 2025 18:50:55

अमरावती, गेल्या सात दिवसांपासून शेतकरी कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी बच्चू कडू यांनी पुकारलेले आंदोलन अखेर मागे घेतले. शनिवार, १४ जून रोजी मंत्री उदय सामंत यांनी आंदोलनस्थळी राज्य सरकारच्या पत्राचे वाचन केले आणि त्यानंतर कडू यांनी आंदोलन मागे घेण्याची घोषणा केली.

यावेळी बोलताना बच्चू कडू म्हणाले की, "सरकारने २ ऑक्टोबरपर्यंत कर्जमाफीसंदर्भात निर्णय घ्यावा अन्यथा आम्ही मंत्रालयात घुसू. मी आंदोलन मागे घेत नाही, तर ते फक्त पुढे ढकलतो आहे. येणारा पाऊस आमच्या डोक्यावर आहे. शेतकऱ्यांची पेरणी येणार आहे. ही पेरणी हुकली तर एक वर्ष हुकणार आहे. कधी पाऊस पडेल आणि कधी पेरणीवर जावे लागेल हे सांगता येत नाही. या आंदोलनाला सगळ्यांनी पाठींबा दिला त्यांचे आभार मानतो”, असेही त्यांनी सांगितले.

उच्चस्तरीय समिती नेमणार

काल बच्चू कडू यांच्याशी माझी भेट झाल्यावर सकारात्मक चर्चा झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी त्यांचे बोलणे करून दिले. त्यांनी सविस्तर चर्चा केली आणि मुख्यमंत्र्यांनी मागण्यांचा सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन दिले. पावसाचे दिवस, पेरण्या आणि शेतीची कामे यामुळे सकारात्मक निर्णय घ्या, अशी विनंती मी त्यांना केली होती. त्यावेळीच त्यांनी कार्यकर्त्यांशी बोलून आंदोलन मागे घेईन, असे सांगितले होते. पुन्हा, आज मंत्री उदय सामंत यांनी आंदोलनस्थळी त्यांच्याशी चर्चा केली. सरकारची भूमिका त्यांना सांगून आंदोलनकर्त्यांसमोर राज्य सरकारचे पत्र वाचून दाखविले. सरकारकडे त्यांनी केलेल्या मागण्यांवर येत्या मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा करण्यात येईल. शेतकरी कर्जमाफीसंदर्भात लवकरच उच्चस्तरीय समिती नेमली जाईल. दिव्यांग बांधवांच्या अनुदान वाढीसंदर्भात विधिमंडळाच्या येणाऱ्या अधिवेशनात आर्थिक तरतूद वाढवून देऊ.

- चंद्रशेखर बावनकुळे, महसूल मंत्री



Powered By Sangraha 9.0