अखेर बच्चू कडूंचे उपोषण स्थगित! २ ऑक्टोबरपर्यंत कर्जमाफीचा निर्णय घेण्याची मागणी

14 Jun 2025 14:32:36



अमरावती : गेल्या सात दिवसांपासून शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी सुरु असलेले प्रहार पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांचे आंदोलन अखेर शनिवार, १४ जून रोजी त्यांनी स्थगित केले आहे. मंत्री उदय सामंत यांनी आंदोलनस्थळी राज्य सरकारच्या पत्राचे वाचन केले आणि त्यानंतर त्यांनी आपले आंदोलन मागे घेतले आहे.

यावेळी बोलताना बच्चू कडू म्हणाले की, "सरकारने २ ऑक्टोबरपर्यंत कर्जमाफीसंदर्भात निर्णय घ्यावा अन्यथा आम्ही मंत्रालयात घुसू. आपण आंदोलन मागे घेत नाही तर ते फक्त पुढे ढकलतो आहे. येणारा पाऊस आमच्या डोक्यावर आहे. शेतकऱ्यांची पेरणी येणार आहे. ही पेरणी हुकली तर एक वर्ष हुकणार आहे. कधी पाऊस पडेल आणि कधी पेरणीवर जावे लागेल हे सांगता येत नाही. या आंदोलनाला सगळ्यांनी पाठींबा दिला त्यांचे आभार मानतो. सगळ्या जाती धर्मातील लोक इथे आले. येत्या काळात आपण प्रत्येक गावात सर्वपक्षीय, सर्व जातीय आणि सर्व धर्मीय शेतकरी शेतमजूर दिव्यांग समिती स्थापन करणार आहोत," असे त्यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले की, "माझी तब्येत फार चांगली नाही. बच्चू भाऊ तुम्ही अन्नत्याग आंदोलन मागे घेतले नाही तर आम्ही सगळे कुटुंबासोबत आत्महत्या करू, असा मेसेज बऱ्याच कार्यकर्त्यांनी केला आहे. किमान २०० ते ३०० मेसेज माझ्या मोबाईलमध्ये येऊन पडले आहेत. पाऊस कधी येणार हे सांगता येत नाही. पेरणीचे दिवस आणि कार्यकर्त्यांची मनधरणी करून आजचे हे आंदोलन तुर्तास स्थगित करत आहे," असेही ते म्हणाले.




Powered By Sangraha 9.0