"कोरोनामुळे नागरिकांनी घाबरुन जाण्याचे कारण नाही पण..." ; उपमुख्यमंत्री अजित पवारांची प्रतिक्रिया

14 Jun 2025 13:56:42



पुणे :
कोरोनामुळे नागरिकांनी घाबरुन जाण्याचे काही कारण नाही. पण ज्यांचे वय जास्त आहेत त्यांनी काळजी घेण्याची गरज आहे, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहेत. शनिवार, १४ जून रोजी त्यांनी पुण्यात माध्यमांशी संवाद साधला.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, "२०२० ला आलेल्या कोरोनाने संपूर्ण जगाला वेढले होते. त्यावेळी आम्ही दर आठवड्याला बैठक घेऊन सगळ्या यंत्रणांना जबाबदारी देऊन कामाला लावायचो. त्यानंतर आपण त्यातून बाहेर पडलो. आतासुद्धा काही देशांमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळले असून सर्वात जास्त रुग्ण केरळमध्ये आहेत. महाराष्ट्रातही आहेत पण पुणे आणि पिंपरी-चिंचवडपुरते बोलायचे झाल्यास सगळे कंट्रोलमध्ये आहे. राज्याचा आढावा दर आठवड्याला मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मंत्रिमंडळ बैठकीमध्ये दिला जातो. आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर हेसुद्धा सतत यावर लक्ष ठेऊन आहेत."

"त्यानंतर विविध उपाययोजना आणि प्रतिबंधात्मक कारवाईबद्दलची आम्ही विभागीय आयुक्तांबरोबरच सर्व अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत चर्चेदरम्यान त्यांनी काही सूचना दिलेल्या आहेत. नागरिकांनी घाबरुन जाण्याचे काही कारण नाही. पण ज्यांचे वय जास्त आहेत, जे वयस्कर लोक आहेत त्यांनी काळजी घेण्याची गरज आहे. खोकला किंवा गर्दी टाळायची गरज आहे. खोकला किंवा शिंका आल्यास नॅपकिन किंवा रुमाल वापरण्याची गरज असून यासंदर्भातील सूचना देण्यात आल्या आहेत," असे त्यांनी सांगितले.




Powered By Sangraha 9.0