गांधीनगर : (Ahmedabad Plane Crash updates) अहमदाबादमध्ये झालेल्या एअर इंडियाच्या विमान अपघातामुळे संपूर्ण देश हादरला आहे. या भीषण अपघातात प्रियजनांना गमावलेल्यांनी आपला आक्रोश व्यक्त केला आहे. दरम्यान, मृतांच्या नातेवाईकांना टाटा समूहाकडून एक कोटी रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. आपल्या वडिलांच्या मृत्यूमुळे दुःखात असलेल्या फाल्गुनी यांचा एक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये टाटा समूहाकडून जाहीर करण्यात आलेल्या आर्थिक मदतीबाबत आक्षेप घेत अपघातात मृत पावलेल्या आपल्या वडिलांना परत आणल्यास आपण टाटा ग्रुपला दोन कोटी देऊ, असे म्हणत फाल्गुनी यांनी संताप व्यक्त केला आहे.
मी २ कोटी देते, माझे वडील परत आणा
अहमदाबादच्या बी. जे. मेडीकल कॉलेज येथे डीएनए चाचणीसाठी रक्ताचे नमुने देण्यासाठी आलेल्या फाल्गुनी यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी फाल्गुनी म्हणाल्या, "एक कोटी रुपये देऊन आमच्या जवळचा व्यक्ती परत येणार आहे का? मी टाटा ग्रुपला दोन कोटी देते, माझे वडील परत आणा. पैशांनी गेलेला माणूस परत येत नाही. माझी आई आजारी आहे. एअर इंडिया, टाटा ग्रुपच्या आर्थिक मदतीमुळे माझे वडील परत येणार आहेत का? मला माझे वडील आणि त्यांचे प्रेम परत हवे आहे. माझे वडील नेहमी एअर इंडियाने प्रवास करण्याला प्राधान्य द्यायचे. एअर इंडिया माझ्या वडिलांना पुन्हा आणू शकते का?", असा संतप्त सवाल फाल्गुनी यांनी उपस्थित केला आहे.
मृतांचा आकडा २७४ वर
माध्यमांच्या माहितीनुसार, एअर इंडिया विमान दुर्घटनेत आतापर्यंत एकूण २७४ लोकांचा मृत्यू झाला आहे. विमानातील २४२ पैकी २४१ प्रवाशांचा तर विमान ज्या वसतिगृहावर कोसळले, तेथील ३३ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे.