अमरावती : मंत्री उदय समांत यांनी शनिवार, १४ जून रोजी प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू यांच्या आंदोलनस्थळी भेट देत राज्य सरकारच्या पत्राचे वाचन केले. त्यानंतर बच्चू कडू यांनी गेल्या सात दिवसांपासून शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी सुरु असलेले आंदोलन स्थगित केले.
मंत्री उदय सामंत म्हणाले की, "मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करून मी बच्चूभाऊंना भेटण्यासाठी इथे आलो. बच्चूभाऊंनी ज्या मागण्या केल्या त्या शासन कशा पूर्ण करणार यासंबंधीचे पत्र घेऊन मी इथे आलो आहे. या पत्रात जे काही लिहिले आहे ते लवकरात लवकर पूर्ण करून घेण्याची आमची सर्वांची जबाबदारी आहे. हे आंदोलन स्वत:साठी नसून शेतकरी आणि दिव्यांग्यांच्या न्याय हक्कासाठी सुरु आहे. त्यामुळे त्यांना न्याय देणे ही आमची जबाबदारी आहे," असे ते म्हणाले.
सरकारच्या पत्रात काय?
शेतकरी कर्जमाफीसाठी १५ दिवसांच्या आत उच्चस्तरीय समिती नेमली जाईल. समितीचा अहवाल आल्यानंतर कर्जमाफीसंदर्भातील निर्णय घेण्यात येईल. तसेच थकीत कर्जदारांच्या सक्तीच्या वसूलीला स्थगिती देणे आणि नवीन कर्ज देण्यासंदर्भात तातडीने बैठक घेऊन निर्णय घेण्यात येईल. दिव्यांग्यांच्या मानधनासाठी ३० जून च्या पुरवणी बजेटमध्ये मानधनवाढीची तरतूद करण्यात येईल. उर्वरित मुद्यांवर संबंधित मंत्री तथा मुख्यमंत्र्यांसोबत बैठक लावून मागण्या निकाली काढण्यात येतील.
ते पुढे म्हणाले की, "बच्चूभाऊंच्या आणि त्यांच्यासमवेत बसलेल्या सगळ्या आंदोलनकर्त्यांच्या काळजीपोटी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या वतीने शासनाने दिलेले पत्र हा आमचा वचननामा आहे असे मानून बच्चूभाऊंनी आपले आंदोलन मागे घ्यावे. शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी महायूतीचे सरकार बच्चूभाऊंच्या सोबत आहे," असे मंत्री उदय सामंत म्हणाले. त्यानंतर बच्चू कडूंनी आपले आंदोलन स्थगित केले.