मुंबईच्या अंगणात वाहणार परदेशी शिक्षणाची गंगा! पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठांना लेटर ऑफ इंटेंट प्रदान

14 Jun 2025 18:37:58



मुंबई :
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी महाराष्ट्रात कॅम्पस स्थापन करण्यासाठी ५ आंतरराष्ट्रीय विद्यापीठांना 'लेटर ऑफ इंटेंट' (LOIs) प्रदान केले असून आता विद्यार्थ्यांचे परदेशी शिक्षणाचे स्वप्न आता भारतातच पूर्ण होणार आहे. शनिवार, १४ जून रोजी हॉटेल ताज येथे ‘मुंबई रायझिंग : क्रिएटिंग अ‍ॅन इंटरनॅशनल एज्युकेशन सिटी’ हा कार्यक्रम पार पडला.

यावेळी मंत्री चंद्रकांत पाटील, विद्यापीठ अनुदान आयोगाचे (UGC) सचिव, उच्च शिक्षण व अध्यक्ष विनीत जोशी, अ‍ॅबर्डीन विद्यापीठाचे उपप्राचार्य, जागतिक सहभाग प्रा. सिलादित्य भट्टाचार्य, यॉर्क विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. चार्ली जेफ्री, वेस्टर्न ऑस्ट्रेलिया विद्यापीठाचे उपकुलगुरू गाय लिटलफेअर यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

शेतकरी कर्जमाफीसाठी उच्चस्तरीय समिती तर दिव्यांग्यांच्या मानधनासाठी...; मंत्री उदय सामंतांकडून बच्चू कडूंना सरकारचे पत्र सुपूर्द

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की, "नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० अंतर्गत भारतीय उच्च शिक्षण क्षेत्रात आंतरराष्ट्रीय सहकार्य वाढवण्याच्या दृष्टीने हे एक ऐतिहासिक पाऊल आहे. मुंबईत या ५ आंतरराष्ट्रीय विद्यापीठांना कॅम्पस स्थापन करण्यासाठी 'लेटर ऑफ इंटेंट' (उद्दिष्टपत्र) देण्याची ही पहिलीच घटना असून यामुळे मुंबईचा ठसा जागतिक शैक्षणिक नकाशावर उमटणार आहे," असे म्हणत त्यांनी या पुढाकाराबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि विद्यापीठ अनुदान आयोग (UGC) यांचे आभार मानले.

एज्युकेशनल सिटी अशी मुंबईची ओळख होणार!

"युनिव्हर्सिटी ऑफ अॅबर्डीन (स्कॉटलंड, यु.के.),युनिव्हर्सिटी ऑफ यॉर्क (यु.के.),युनिव्हर्सिटी ऑफ वेस्टर्न ऑस्ट्रेलिया (ऑस्ट्रेलिया),इलीनॉय इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (अमेरिका),इस्तितुतो यूरोपीओ दी डिझाईन (इटली) ही जगातील पाच नामवंत विद्यापीठे भारतात येत आहेत. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरात ही विद्यापीठे उभी राहणार आहेत. याच परिसरात येत्या काही वर्षात मेडिसिटी, स्पोर्टस सिटी आणि इनोव्हेशन सिटी उभारण्यात येणार आहे. येथे आगामी कालावधीत दहा विद्यापीठे एकत्र येतील अशी संकल्पना राबवण्यिाचा विचार आहे. सध्या या पाच विद्यापीठांमुळे हा परिसर पूर्ण शिक्षण आणि संशोधन साठी ओळखला जाईल. मुंबईची सध्या वित्तीय, औद्योगिक आणि मनोरंजन उद्योगाचे शहर म्हणून ओळख आहे. विद्यापीठामुळे एज्युकेशनल सिटी अशी ओळख होईल. विकसित भारत २०४७ मध्ये हा निर्णय महत्वाची भूमिका बजावेल," असेही ते म्हणाले.

ते पुढे म्हणाले की, "या आंतरराष्ट्रीय विद्यापीठांच्या आगमनामुळे, केवळ भारतीय विद्यार्थ्यांनाच नव्हे तर भारतात शिक्षण घेणाऱ्या आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांनाही जागतिक दर्जाचे शिक्षण स्थानिक पातळीवरच उपलब्ध होणार आहे. यामुळे आर्थिक अडचणींमुळे परदेशात जाऊ न शकणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांना परवडणाऱ्या दरात जागतिक शिक्षणाची संधी मिळणार आहे. संपूर्ण परिसंस्था येथेच तयार झाली असून एकही विद्यार्थी जागतिक शिक्षणापासून वंचित राहणार नाही. कोणाचेही स्वप्न अपूर्ण राहणार नाही, ते इथेच पूर्ण होईल," असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.



Powered By Sangraha 9.0