उल्हासनगरात कचरा उचलणाऱ्या कामगारांचा काम बंद आंदोलनाचा इशारा

13 Jun 2025 19:22:18

उल्हासनगर, उल्हासनगर शहरातील कचरा उचलणाऱ्या कोणार्क कंपनीच्या कर्मचाऱ्यांना एक महिना होऊनही अद्याप पर्यंत पगार न दिल्याने कामगारांमध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे . शुक्रवारी या कामगारांनी काम बंद आंदोलन सुरू केले. कामगाराच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या लढा कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप गायकवाड यांनी जोपर्यंत कामगारांना पगार देत नाही तोपर्यंत काम बंद आंदोलन करण्याची भूमिका घेतल्याने शुक्रवारी कामगारांनी काम बंद आंदोलन केले. कामगारांनी सुरू केलेल्या या आंदोलनामुळे शहरात कचऱ्याचे ढीग साचलेले पाहायला मिळत आहेत. त्यामुळे रोगराई पसरण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

उल्हासनगर महापालिकेने शहरातील कचरा उचलण्याचा ठेका कोणार्क कंपनीला दिलाय. कचरा उचलण्यावर दिवसाला साडेआठ लाख खर्च महापालिका करते. कोणार्क कंपनीने गेल्या एक महिन्यापासून कामगारांना पगार दिलेला नाही असे कामगार सांगत आहेत. कचरा उचलणाऱ्या ७०० पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांचे वेतन दिले नाही. कामगारांचे ७ तारखेला पगार झाला नसल्याने त्यांच्यात असंतोष निर्माण झाले आहे . कामगारांच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या लढा कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप गायकवाड यांनी वेतन नाही तोपर्यंत काम बंद अशी भूमिका घेतल्याने शुक्रवारी काम बंद आंदोलन कामगारांनी सुरु केले आहे. दरम्यान कामगार हे तुटपुंजा पगारात काम करत असल्याचा आरोप कामगार करत आहेत.

या बाबत कामगारांच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या लढा कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप गायकवाड यांनी सांगतले कोणार्क कंपनी प्रशासनाकडून दर महिन्याला पगार देण्याबाबत दिरंगाई केली जाते. त्यामुळे सर्वसामान्य कामगार जे शहराची स्वच्छता करतात त्यांचं महिन्याभराचं गणित बिघडून जाते. कामगारांना पगार वेळेवर मिळत नसल्यामुळे त्यांना अनेक प्रसंगाचा सामना करावा लागतो. आता शैक्षणिक वर्ष चालू होत आहे. मुलांच्या शाळा सुरू होणार आहेत. मुलांना लागणारा गणवेश त्यांना लागणारी पुस्तके, दप्तर घ्यायचे आहेत. पण १३ तारीख आली तरी अद्याप कंपनी प्रशासनाने कामगारांचा पगार दिला नसल्यामुळे कामगारांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.



Powered By Sangraha 9.0