'बर्गर सिंग' या ब्रँडचा गैरवापर करणाऱ्यावर न्यायालयाची चपराक!

13 Jun 2025 18:16:58


नवी दिल्ली(Trademark Infringement): दिल्ली उच्च न्यायालयाने नुकताच 'बर्गर सिंग' या ब्रँडच्या चिन्हाचा अनधिकृत वापर रोखण्यासाठी महत्त्वाचा आदेश दिला आहे. टिपिंग मिस्टर पिंक प्रायव्हेट लिमिटेड विरुद्ध डॉ. प्रभात रंजन, या खटल्यात याचिकाकर्त्याने 'सावेरा ईट्स'(प्रतिवादी) यांच्याविरुद्ध ट्रेडमार्क उल्लंघनाचा दावा केला होता.

याचिकाकर्त्याने २०१३ पासून 'बर्गर सिंग' या ब्रँडखाली आपली फूड कंपनी चालवित आहेत,आणि २०२३ मध्ये पाटणा येथील एका आउटलेटला ५ वर्षांसाठी 'बर्गर सिंग' चिन्ह वापरण्याचा परवाना दिला होता. मात्र, प्रतिवादीने कराराच्या अटींचे उल्लंघन केले, ज्यात कालबाह्य अन्नपदार्थांचा वापर, कच्च्या मालाचे पैसे न देणे आणि सीसीटीव्ही कॅमेरा नेटवर्क तोडणे यांचा समावेश होता. त्यामुळे, याचिकाकर्त्याने मे २०२५ मध्ये करार रद्द केला. तथापि, प्रतिवादीने 'बर्गर सिंग' चिन्हाचा वापर सुरू ठेवला आणि ब्रँड अंतर्गत वस्तू विकण्याचा प्रयत्न केला.

न्यायमूर्ती संजीव नरुला यांनी या प्रकरणात तात्पुरता आदेश जारी केला. ज्यात न्यायालयाने प्रतिवादींना 'बर्गर सिंग' चिन्ह वापरण्यापासून रोखले आणि स्थानिक आयुक्त नियुक्त करून संभाव्य पुरावे जप्त करण्याचे निर्देश दिले. न्यायालयाने म्हटले की, याचिकाकर्त्याला ब्रँड संदर्भात नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे, त्यांनी दिलेल्या आदेशानुसार प्रतिवादींना 'बर्गर सिंग' किंवा त्याच्याशी संबंधित कोणतेही चिन्ह वापरता येणार नाही.
या तात्पुरत्या आदेशामुळे ब्रँड मालकांना त्यांच्या ट्रेडमार्कच्या संरक्षणासाठी न्यायालयीन मार्गाने न्याय मिळवण्याची प्रेरणा मिळाली.



Powered By Sangraha 9.0