गृहनिर्माण संकुलातील कचरा रस्त्यांवर टाकणाऱ्या खासगी कंत्राटदारांवर कठोर कारवाई करा : अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी यांचे निर्देश

13 Jun 2025 12:44:08

strict action against private contractors dumping garbage on roads
 
 
मुंबई : सार्वजनिक स्वच्छतेसाठी नेमलेले बृहन्मुंबई महानगरपालिकेचे कर्मचारी तसेच बाह्य संस्थांचे कर्मचारी यांनी अधिकाधिक जबाबदारीने स्वच्छता केल्यास मुंबई महानगर हे अधिक स्वच्छ आणि सुंदर राहील. त्यासाठी प्रत्येकाने आपले कर्तव्य योग्यप्रकारे पार पाडावे. तथापि, नेमून दिलेल्या कार्यक्षेत्रावर अनुपस्थित राहिल्यास अथवा कर्तव्यात कोणत्याही प्रकारची कसूर करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्यात येईल. गृहनिर्माण संकुलांमधून संकलित केलेला कचरा खासगी कंत्राटदार रात्रीच्या वेळी रस्त्यांवर टाकून देत असल्याचे निदर्शनास आले आहे. असे प्रकार कदापि सहन केले जाणार नाहीत. त्यामुळे, अशा कंत्राटदारांवर कठोर कारवाई करावी, असे निर्देश अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त अश्विनी जोशी यांनी दिले आहेत.
 
घनकचरा व्यवस्थापनासंदर्भात पूर्व उपनगरातील सर्व प्रशासकीय विभागांच्या कामकाजाचा डॉ जोशी यांनी घाटकोपर स्थित ‘एन’ विभाग कार्यालयात आयोजित बैठकीत  दिनांक १२ जून २०२५ आढावा घेतला. त्यावेळी त्यांनी हे निर्देश दिले.
 
डॉ. जोशी पुढे म्हणाल्या, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांनी प्रत्येकाला नेमून दिलेल्या परिसराची प्रामाणिकपणे स्वच्छता केली तर संपूर्ण मुंबई महानगर हे स्वच्छ आणि सुंदर राहील. यासाठी सहायक मुख्य पर्यवेक्षक, कनिष्ठ अभियंता आणि मुकादम यांनी आपापसातील समन्वयाने तसेच योग्य संवाद ठेवून जबाबदारी पार पाडावी. तसेच, सर्व प्रशासकीय विभागांचे सहायक आयुक्त यांनी त्यांच्या अधिकार क्षेत्रातील स्वच्छता कर्मचाऱ्यांची प्रत्यक्ष कार्यक्षेत्रावरील  उपस्थिती, कामगिरी आदी बाबींची नियमित पाहणी करून आढावा घ्यावा. तसेच, स्थानिक परिस्थिती, वर्दळीची ठिकाणे तसेच मोठ्या प्रमाणात कचरा संकलित होणारी ठिकाणे आदी बाबींचा विचार करुन कचरा संकलनासाठी सूक्ष्म आराखडा तयार करावा, अशा सूचनाही डॉ. अश्विनी जोशी यांनी दिल्या. उपायुक्त घनकचरा व्यवस्थापन किरण दिघावकर, उपायुक्त परिमंडळ-६  संतोषकुमार धोंडे यांच्यासह पूर्व उपनगरातील सर्व प्रशासकीय विभागांचे वॉर्ड सहायक आयुक्त तसेच घनकचरा व्यवस्थापन विभागाचे अधिकारी या बैठकीस उपस्थित होते.
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0