आई-वडीलांचा निरोप घेतला अन् रोशनीवर काळाचा घाला! अहमदाबाद विमान दुर्घटनेत डोंबिवलीच्या तरुणीचा दुर्दैवी मृत्यू

13 Jun 2025 11:53:56


मुंबई : अहमदाबादमध्ये झालेल्या विमान दुर्घटनेत डोंबिवलीतील २७ वर्षीय रोशनी सोनघरे या तरुणीचा मृत्यू झाला आहे. एअर इंडियाच्या विमानात ती फ्लाइट क्रू म्हणून कार्यरत होती. तिने बुधवारी आईवडीलांचा निरोप घेतला खरा पण तो निरोप शेवटचा ठरला. विमान दुर्घटनेत रोशनीने आपला जीव गमावला आहे.

गुरुवार, १२ जून रोजी अहमदाबादहून लंडनला जाणारे एअर इंडियाचे विमान उड्डाण घेतल्यानंतर अवघ्या काही मिनिटांत कोसळले. या दुर्घटनेत २६५ लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. यात २२९ प्रवासी, १२ क्रु मेंबर आणि ज्या वसतीगृहावर हे विमान कोसळले तेथील २४ विद्यार्थी आणि डॉक्टरांचा समावेश आहे.

यात डोंबिवलीच्या रोशनी सोनघरे या तरुणीचाही मृत्यू झाला आहे. रोशनी सोनघरे ही डोंबिवली पूर्वेकडील राजाजी पथ परिसरात राहत असून ती एअर इंडियाच्या विमानात क्रु मेंबर म्हणून कार्यरत होती. बुधवारी आई-वडीलांचा निरोप घेऊन ती अहमदाबादमध्ये कामावर रूजू झाली. गुरुवारी ती अहमबादहून लंडनला जाण्यासाठी सज्ज झाली. मात्र, काळाने घाला घातला आणि विमान अपघातात तिचा दुर्दैवी अंत झाला.

लहानपणापासून हवाई सुंदरी होण्याचे स्वप्न!

रोशनी सोनघरे हिचे लहानपणापासूनच हवाई सुंदरी होण्याचे स्वप्न होते. तिच्या आईवडीलांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत तिचे शिक्षण पूर्ण केले आणि रोशनी एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानात फ्लाइट क्रू म्हणून रुजू झाली. मात्र, याच विमानाचा अपघात झाला आणि रोशनीने अखेरचा श्वास घेतला. अपघाताची बातमी कळल्यानंतर रोशनीचे वडील आणि भाऊ अहमदाबादकडे रवाना झाले आहेत.


Powered By Sangraha 9.0