शनिशिंगणापूर मंदिर व्यवहारात मुस्लिमांची भागीदारी कायम; मागणी मान्य जरी झाली तरी आंदोलन अटळ – सकल हिंदू समाज

13 Jun 2025 20:58:51

अहिल्यानगर, शनिशिंगणापूर येथील देवस्थान ट्रस्टने ११४ मुस्लिम कर्मचाऱ्यांना कामावरून हटवले असले तरी, या कारवाईमागे मंदिर प्रशासनाचे मुस्लिम भागीदारांशी असलेले आर्थिक संबंध लपवण्याचा उद्देश असल्याचा आरोप सकल हिंदू समाज – अहिल्यानगर या संघटनेने केला आहे. त्यांच्या माहितीनुसार, या कारवाईत ५० हून अधिक हिंदू कामगारांनाही अन्यायाने नोकरीवरून काढण्यात आले, आणि ‘केवळ मुस्लिमांवरच कारवाई केली नाही’ असा खोटा समतोल दाखवण्याचा प्रयत्न केला गेला.

आंदोलन समितीच्या माहितीनुसार, मंदिर प्रशासन आजही काही महत्त्वाचे व्यवहार मुस्लिम कंत्राटदारांशीच करत असून, हे व्यवहार तत्काळ थांबवण्याची मागणी त्यांनी केली आहे. मंदिर हे हिंदू श्रद्धेचे पवित्र केंद्र आहे. त्यामुळे त्याच्या व्यवहारात केवळ हिंदू समाजाशी संलग्न असलेल्या व्यक्तींनाच स्थान द्यावे, अशी ठाम भूमिका संघटनेकडून मांडण्यात आली आहे.

संघटनेने हेही नमूद केले की, या संपूर्ण प्रकरणामागे माजी मंत्री शंकरराव गडाख यांचा हस्तक्षेप असून, त्यांच्या राजकीय दबावामुळेच मंदिर प्रशासनाने मुस्लिम कंत्राटदारांचे हित जपण्यासाठी ही मोहीम आखली होती. मुस्लिम काढले असले तरी त्यांच्याशी असलेली भागीदारी अद्याप कायम आहे, हे जनतेपासून लपवण्यासाठी हिंदू कामगारांचाही बळी देण्यात आला आहे.


या पार्श्वभूमीवर सकल हिंदू समाज – अहिल्यानगर संघटनेने पुढील मागण्या स्पष्टपणे मांडल्या आहेत –

मंदिर व्यवस्थापनाने सर्व व्यवहार फक्त हिंदू समाजाशी संलग्न असलेल्या व्यक्तींशीच करावेत

सध्या कार्यरत मुस्लिम कंत्राटे तात्काळ रद्द करावीत

अन्यायाने हटवण्यात आलेल्या हिंदू कामगारांना तात्काळ पुन्हा नोकरीत घेतले जावे

माजी मंत्री शंकर गडाख यांच्या हस्तक्षेपाची सखोल चौकशी करण्यात यावी

या पार्श्वभूमीवर १४ जून रोजी सायंकाळी ४ वाजता शनिशिंगणापूर पोलीस ठाण्यापासून मंदिर प्रशासन कार्यालयापर्यंत तीव्र स्वरूपात मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चाचे नेतृत्व आमदार संग्रामदादा जगताप, हिंदुत्ववादी युवा नेते सागरभैय्या बेग, आणि भाजपा आध्यात्मिक आघाडीचे प्रमुख आचार्य तुषार भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.सदर मोर्चासाठी राज्यभरातील हिंदुत्वनिष्ठ संघटनांना आवाहन करण्यात आले असून, मागण्या मान्य झाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नसल्याचे संघटनेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

मंदिर व्यवहार हिंदूंशीच असावा; आंदोलन होणारच!

शनि शिंगणापूर मंदिर प्रशासनाचे व्यवहार मुस्लिम ठेकेदारांशी सुरू आहेत हे लपवण्यासाठी ५० हून अधिक हिंदू कामगारांनाही नोकरीवरून काढण्यात आले, हे केवळ ढाल वापरण्याचे साधन आहे. शनिमंदिर हे हिंदू श्रद्धेचे केंद्र असून, ते अपवित्र मानसिकतेच्या लोकांच्या ताब्यात जाण्याची आम्ही परवानगी देणार नाही. येथील सर्व व्यवहार हिंदू समाजाशी संलग्न असावेत आणि हिंदू कामगारांना पुन्हा कामावर घ्यावे ही आमची ठाम मागणी आहे. मागण्या पूर्ण न झाल्यास आंदोलन होणारच!

– सागर भैय्या बेग, हिंदुत्ववादी युवा नेते अहिल्यानगर




Powered By Sangraha 9.0