मुंबई मेट्रो ९ने गाठला महत्वाचा टप्पा एमएमआरडीएने दिली माहिती

13 Jun 2025 20:28:37

मुंबई, एमएमआरडीएच्या ३३७.१० किलोमीटर लांबीच्या मेट्रो नेटवर्कचा एक महत्त्वाचा घटक असलेला मेट्रो मार्ग ९ हा दहिसर (पूर्व) ते मीरा-भाईंदर दरम्यान जोडणारा असून, सध्या या मार्गाचे काम वेगाने प्रगतीपथावर आहे. या अंतर्गत, भायंदर पश्चिम येथील उड्डाण पुलाजवळील अत्यंत आव्हानात्मक आणि वर्दळीच्या परिसरात ६५ मीटर लांबीचा मिश्र स्टील गर्डर यशस्वीरित्या प्रस्थापित करण्यात आला. हे कार्य मर्यादित रात्रीच्या वेळेत विविध यंत्रणांमधील अचूक समन्वयाने पूर्ण करण्यात आले, असल्याची माहिती मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने दिली आहे.

या आव्हानात्मक कामाची अंमलबजावणी दि. ७, ८ व ११ जून २०२५ रोजी रात्री १.५ तासांच्या ब्लॉकमध्ये पूर्ण करण्यात आली. यामध्ये ६०० मेट्रिक टन व ७५० मेट्रिक टन क्षमतेचे क्रेन्स वापरले तर ६०० मेट्रिक टनची एक राखीव क्रेन ठेवण्यात आली होती. यासाठी पश्चिम रेल्वे, कोकण रेल्वे व वाहतूक पोलीस यांचे मोलाचे सहकार्य केले. प्रकल्पाचा पहिला दहिसर (पूर्व) ते काशिगाव हा टप्पा डिसेंबर २०२५मध्ये कार्यान्वित करण्याचे नियोजन आहे ते दुसरा टप्पा काशिगाव - नेताजी सुभाषचंद्र बोस चौक हा डिसेंबर २०२६मध्ये कार्यान्वित करण्याचे नियोजन आहे.

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (एमएमआरडीए) दहिसर ते मिरा-भाईंदर मेट्रो ९ मार्गिकेचे काम सध्या वेगात सुरु असून या मार्गिकेतील दहिसर ते काशीगाव हा पहिला टप्पा लवकरात लवकर वाहतूक सेवेत दाखल करण्याचे एमएमआरडीएचे नियोजन आहे. शनिवारी, १० मे रोजी यामार्गातील दहिसर ते काशीगावदरम्यान मार्गिकेवरील विद्युत प्रवाह कायमस्वरुपी कार्यान्वित करण्यात आला. त्यामुळे मार्गावर चाचण्यांचा मार्ग खुला झाला. त्यानंतर आता उर्वरित भागातही कामांना गती आहे. मेट्रो ९ मार्गिकेच्या पहिल्या टप्प्यात चार स्थानके असणार आहेत. दहिसर, पांडुरंग वाडी, मीरागाव, काशीगाव अशी स्थानके आहेत.

मार्गिकेविषयी चौकट

लांबी- १०.५४ किमी

स्थानके- ८ उन्नत

एकूण प्रगती – ९५%

कार्यक्षेत्र – भायंदर पश्चिम, पश्चिम रेल्वे मार्गावर

टप्पा १: दहिसर (पूर्व) – काशिगाव (डिसेंबर २०२५)

टप्पा २: काशिगाव – नेताजी सुभाषचंद्र बोस चौक (डिसेंबर २०२६)




Powered By Sangraha 9.0