नवी मुंबई : अहमदाबादहून लंडनला जाणारे एअर इंडियाचे AI-१७१ विमान कोसळून झालेल्या अपघातात पनवेलच्या मैथिली पाटील या तरुणीचा करुण अंत झाला आहे. अवघे २२ वर्षे वय असलेली मैथिली पाटील अपघातग्रस्त विमानात हवाई सुंदरी म्हणून कार्यरत होती.
गुरुवार, १२ जून रोजी दुपारी अहमदाबादहून लंडनला जाणारे एअर इंडियाचे AI-१७१ विमान कोसळून मोठा अपघात घडला. या भीषण विमान अपघातात एकूण २६५ लोकांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये पनवेल तालुक्यातील न्हावा गावच्या मैथिली पाटीलचा समावेश आहे.
न्वाहासारख्या ग्रामीण भागातून मैथिली पाटीलने १२ पर्यंतचे शिक्षण घेतले. लहानपणापासूनच तिने हवाई सुंदरी बनण्याचे स्वप्न उराशी बाळगले होते. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत तिने एव्हिएशनचे शिक्षण पूर्ण केले. दोन वर्षांपूर्वी शिक्षण पूर्ण करून ती एअर इंडियामध्ये हवाई सुंदरी म्हणून रूजू झाली होती.
मात्र, गुरुवारी झालेल्या विमान अपघातात तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. मैथिली पाटील हिच्या पश्चात आई, वडील, बहिण आणि भाऊ असा परिवार आहे. मैथिलीच्या मृत्यूमुळे तिच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर पसरला आहे. अपघाताची बातमी कळताच तिचे कुटुंबिय मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी अहमदाबादकडे रवाना झाले आहेत.