एअर इंडिया विमान अपघातात खुशबू राजपुरोहित यांचा मृत्यू; पतीला भेटण्यासाठी निघाली होती लंडनला

13 Jun 2025 14:55:28


अहमदाबाद
: एअर इंडियाच्या ए-१४१ अहमदाबाद-लंडन या विमानाचा उड्डाणाच्या काही कालावधीनंतर अपघात झाला. यात एकूण २४१ प्रवासी आणि २४ विद्यार्थी व डॉक्टर, असे मिळून २६५ जणांचा मृत्यू झाला. राजस्थानच्या पाली जिल्ह्यातील खुशबू राजपुरोहित यांचाही या मृतांमध्ये सामावेश होता. खुशबूचा पाच महिन्यांपूर्वीच विवाह झाला होता. तिचे पती मयूर पुरोहित हे लंडनमध्ये डॉक्टर म्हणून रुग्णसेवा बजावतात. खुशबू त्यांना भेटण्यासाठी लंडनला निघाली होती. ही तिची पतीसोबतची पहिली भेट होती, कारण विवाहानंतर लगेच मयूर लंडनला रवाना झाले होते. त्यामुळे खुशबूची ही पहिली परदेश यात्रा ठरणार होती.


खुशबू आणि मयूरच्या लग्नानंतर दोघेही आपापल्या कामात व्यस्त होते. खुशबू राजस्थानमध्ये राहत होती, तर मयूर लंडनमध्ये. दोघेही एकमेकांना भेटण्यासाठी खूप उत्सुक होते. खुशबूचा लंडन प्रवास म्हणजे त्यांच्या प्रेमाच्या नव्या पर्वाची सुरुवात असणार होती. २५ वर्षाची खुशबू अत्यंत आनंदात होती. लग्नानंतर नव्या आयुष्याची सुरुवात करण्यासाठी ती उत्सुक होती. नियतीत काही वेगळंच लिहिलेल होतं.


विमान उड्डाण केल्यानंतर काही क्षणातच त्यात तांत्रिक बिघाड झाला. त्यानंतर विमानाने नियंत्रण गमावले आणि काही मिनिटांतच जमिनीवर आदळले. या भीषण अपघातात विमान पूर्णपणे नष्ट झाले. बचाव कार्यात अग्निशमन दल, पोलीस आणि स्थानिक प्रशासन तत्काळ सहभागी झाले. या अपघातात २५१ जणांचा जागीच मृत्यू झाला. मृतांची ओळख पटवण्यासाठी डीएनए चाचणीचा आधार घेतला जात आहे. खुशबूमृत्यूची बातमी तिच्या कुटुंबाला मिळाल्यानंतर घरात शोककळा पसरली. संपूर्ण गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.
Powered By Sangraha 9.0