"कन्नड ही भाषा तमिळ भाषेतून जन्माला आली!", कमल हसनच्या बेताल वक्तव्यामुळे कर्नाटकात चित्रपटावरील बंदी कायम
13 Jun 2025 14:41:16
बंगळुरू(Ban on Thug Life): कमल हसन यांचा तमिळ चित्रपट 'ठग लाईफ' हा कर्नाटक वगळता संपुर्ण भारतात ५ जून ला प्रदर्शित झाला. प्रदर्शनाच्या पूर्वी हसन यांनी 'कन्नड ही भाषा तमिळ भाषेतून जन्माला आली', असे वक्तव्य केल्याने, कर्नाटक राज्य सरकारने चित्रपटाच्या प्रदर्शनावर भाषिक भावनेला ठेच पोहचल्यामुळे बंदी घातली होती. या बंदीच्या विरोधात जनहीत याचिकेद्वारे सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. या याचिकेत बाबत न्यायालयाने शुक्रवारी, दि.१३ जून रोजी कर्नाटक राज्याला नोटीस बजावली आहे.
न्या. प्रशांत कुमार मिश्रा आणि न्या. मनमोहन यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी पार पडली. महेश रेड्डी यांनी दाखल केलेल्या याचिकेत म्हटल्यानुसार, कर्नाटक राज्य सरकारने राज्यातील थिएटरमध्ये ‘ठग लाईफ’ हा रीतसर प्रमाणित तमिळ चित्रपट प्रदर्शित करण्यास परवानगी नाही असे सांगितले, आणि ही बंदी कोणत्याही कायदेशीर प्रक्रियेतून दिली नाही,तर हिंसाचाराच्या धमकीखाली ही बंदी दिली गेली. न्यायालयासमोर आणलेला मुद्दा लक्षात घेऊन, आम्ही कर्नाटक राज्य सरकारला नोटीस बजावतो," असे खंडपीठाने आदेशात म्हटले आहे.
यात याचिकाकर्त्याकडून कर्नाटक राज्याच्या निष्क्रियतेमुळे आणि राज्य सरकारच्या आश्रयामुळे हिंसाचार भडकवणाऱ्या घटकांविरुद्ध चित्रपट निर्माते, प्रदर्शक आणि प्रेक्षकांच्या संविधानाच्या कलम १४ (समानतेचा अधिकार), १९(१)(अ) (भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार), १९(१)(ग) (कोणताही व्यवसाय करण्याचा अधिकार) आणि २१ (जीवनाचा आणि वैयक्तिक स्वातंत्र्याचा अधिकार) यांचे उल्लंघन होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. हिंसाचारापासून संरक्षण मिळवण्यासाठी तुम्ही उच्च न्यायालयात जा, असे सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने म्हणत आणि कोणताही आंतरिम आदेश न देता, पुढील सुनावणी मंगळवारपर्यंत स्थगित केली.