नवी दिल्ली, भारतीय हवाई दलाला रडार स्टेशन, हवाई संरक्षण युनिट्स आणि शत्रूच्या जमिनीवरील लक्ष्यांवर अचूक हल्ला करण्यासाठी आवश्यक ‘गुप्तचर, देखरेख, लक्ष्य अधिग्रहण आणि शोध’ (आय-स्टार) यंत्रणेची तीन अत्याधुनिक गुप्तचर विमाने खरेदी करण्यासाठीचा १० हजार कोटी रुपयांच्या प्रस्तावास लवकरच मंजुरी मिळू शकते.
गुप्तचर, देखरेख, लक्ष्य अधिग्रहण आणि शोध (आय-स्टार) साठी १० हजार कोटी रुपयांचा प्रकल्प जूनच्या चौथ्या आठवड्यात होणाऱ्या संरक्षण मंत्रालयाच्या उच्चस्तरीय बैठकीत मंजुरीसाठी घेतला जाण्याची शक्यता आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेद्वारे (डीआरडीओ) विकसित केल्या जाणाऱ्या गुप्तचर विमान प्रकल्पात बोईंग आणि बॉम्बार्डियरसह परदेशी उत्पादकांकडून खुल्या निविदाद्वारे तीन विमाने खरेदी करण्याचा समावेश आहे.
विमानातील आय-स्टार यंत्रणा पूर्णपणे स्वदेशी असतील. डीआरडीओच्या सेंटर फॉर एअरबोर्न सिस्टम्सने (सीएबीएस) त्या यशस्वीरित्या विकसित केल्या आहेत. आय-स्टार यंत्रणेच्या विकासामुळे भारताचा समावेश अशी यंत्रणा असलेल्या अमेरिका, युके, इस्रायल आदी निवडक राष्ट्रांच्या समुहात होणार आहे.
आय-स्टारचे वैशिष्ट्य
• आय-स्टार यंत्रणा गतिमान आणि तत्काळ ल लक्ष्यीकरण क्षमता प्रदान करते.
• शत्रूचे लक्ष्य शोधण्यासाठी आणि निरीक्षण करण्यासाठी बहु-स्पेक्ट्रल पाळत ठेवण्याची क्षमता आहे.
• आय-स्टार प्रणाली दिवसा आणि रात्रीही गुप्तचर माहिती गोळा करण्यासाठी सक्षम आहे.
• आय-स्टार विमान ही हवाई आणि जमिनीवरील उपकरणांचा समावेश असलेली प्रणाली असेल.