शाहिदी शताब्दी आणि गुरु-ता-गद्दी समागमच्या आयोजनासाठी सहकार्य करणार! - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; समागम कार्यक्रमाच्या आयोजनासाठी राज्यस्तरीय समितीची बैठक

13 Jun 2025 20:19:53

मुंबई, गुरु तेग बहादूर साहेबजी यांचा ३५० वा शाहिदी आणि गुरुगोविंद सिंगजी यांचे ३५० वा गुरु-ता-गद्दी समागम कार्यक्रमाचे आयोजन राज्यात नांदेड, नागपूर व मुंबई या तीन ठिकाणी करण्यात येईल. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी राज्य शासन संपूर्ण सहकार्य करेल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. या कार्यक्रमांमधून श्री गुरु तेग बहादूर साहेबजी व गुरुगोविंद सिंगजी यांचा इतिहास निश्चितच पुढील पिढीपर्यंत पोहोचविता येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

वर्षा निवासस्थानी शुक्रवार, दि. १३ जून रोजी श्री गुरु तेग बहादूर ३५० शाहिदी समागम व गुरु गोविंद सिंग गुरु-ता-गद्दी समागम कार्यक्रमाच्या आयोजनबाबत राज्यस्तरीय समितीची बैठक पार पडली. बैठकीस राज्यस्तरीय समितीचे मार्गदर्शक संत ज्ञानी हरनाम सिंहजी खालसा, धर्मगुरू संत श्री बाबूसिह महाराज, संत रघुमुनीजी महाराज, गोपाल चैतन्यजी महाराज, शरद ढोले उपस्थित होते.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, संघर्ष काळात समाजाचे शोषण होत असताना गुरु तेग बहादूर यांनी समाजासाठी समर्पण केले. औरंगजेबाच्या जुलमी राजवटीत होत असलेला अन्याय दूर करण्यासाठी त्यांनी लढा दिला. समाजासाठी ते शहीद झाले, हा इतिहास पुढील पिढीला कळणे अत्यंत आवश्यक आहे. या कार्यक्रमांमधून मागील इतिहास सांगणे हेच अपेक्षित नाही, तर या पिढीच्या असलेल्या जबाबदाऱ्यांची जाणीव त्यांना करून देण्यात येणार आहे. देशाच्या मजबूतीकरणासाठी लढणाऱ्या लोकांचा हा कार्यक्रम असणार आहे. वेगवेगळे समाज एकत्र येऊन हा कार्यक्रम होणार आहे. या सर्वांच्या एकजुटीतून देश घडविण्याची आणि आपला इतिहास हा समाजाच्या माध्यमातून नवीन पिढीपर्यंत पोहोचविण्याची ही एक संधी असल्याचे त्यांनी सांगितले.

नांदेड, नागपूर आणि मुंबईत आयोजन

यावेळी राज्यस्तरीय समितीचे समन्वयक रामेश्वर नाईक यांनी माहिती दिली. समागमाचे आयोजन नांदेड येथे १५ व १६ नोव्हेंबर, नागपूर येथे ६ डिसेंबर, नवी मुंबई येथे २१ व २२ डिसेंबर २०२५ दरम्यान करण्याचे नियोजन आहे. बैठकीच्या सुरुवातीला मार्गदर्शक संत श्री बाबूसिंहजी महाराज, संत ज्ञानी हरनाम सिंहजी खालसा, शरदराव ढोले यांनीही आपले विचार व्यक्त केले.




Powered By Sangraha 9.0