अहमदाबाद विमान अपघाताचं सत्य उलगडणार! अपघातग्रस्त विमानाचा ब्लॅक बॉक्स सापडला; पण ब्लॅक बॉक्स म्हणजे नेमकं काय?

13 Jun 2025 12:57:06


मुंबई : अहमदाबाद विमान अपघाताने संपूर्ण देशभरात खळबळ उडाली असताना लवकरच हा अपघात नेमका कसा झाला या प्रश्नाचे गूढ उलगडणार आहे. एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील ब्लॅक बॉक्स सापडल्याची माहिती समोर आली असून यामुळे विमान अपघाताचे नेमके कारण समोर येणार आहे.

अहमदाबादमध्ये झालेल्या विमान अपघातात तब्बल २६५ जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेने संपूर्ण देश हादरला असून मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरु आहे. दरम्यान, आता या विमानातील ब्लॅक बॉक्स सापडला असून लवकरच या अपघाताचे कारण समजणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हा ब्लॅक बॉक्स विश्लेषणासाठी दिल्लीला पाठवण्यात आला आहे. तसेच विमानातील दुसऱ्या ब्लॅक बॉक्सचा शोध घेणे सुरु आहे.

प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण, दोन वर्षांपूर्वी एअर इंडियात रुजू! पनवेलच्या मैथिली पाटीलचा करूण अंत

ब्लॅक बॉक्स म्हणजे काय? त्याचं काम काय असतं?

कोणत्याही विमानाचा किंवा हेलिकॉप्टरचा अपघात झाल्यानंतर अपघातग्रस्त विमानाचा किंवा हेलिकॉप्टरचा ब्लॅक बॉक्स मिळवणे ही प्राथमिकता असते. एखाद्या विमान किंवा हेलिकॉप्टर दुर्घटनेनंतर सर्वात महत्वाची गोष्ट ही फ्लाईट डेटा रेकॉर्डर (एफडीआर) असते. यामध्ये काही आकडेवारी दिलेली असते, तर कॉकपिट व्हॉईस रेकॉर्डर (सीव्हीआर) याद्वारे संभाषण रोकॉर्ड केले जाते. यालाच ब्लॅक बॉक्स असे म्हणतात.

कॉकपिट व्हॉईस रेकॉर्डर कॉकपिटमधील रेडिओ ट्रान्समिशन आणि इतर आवाज रेकॉर्ड करतो. यात वैमानिकांमधील संभाषण आणि इंजिनचा आवाजाचा समावेश आहे. तसेच फ्लाइट डेटा रेकॉर्डर उंची, एअरस्पीड, फ्लाइट हेडिंग, ऑटोपायलट स्थिती अशा ८० हून अधिक विविध प्रकारच्या माहितीची नोंद करतो. व्यावसायिक विमानांमध्ये ब्लॅक बॉक्स अनिवार्य आहेत. विमानावर कायदेशीर हक्क प्रस्थापित करणे हा त्यामागील हेतू नसून अपघाताची कारणे जाणून घेणे आणि भविष्यात असे अपघात होऊ नये हा असतो. दरम्यान, आता अहमदाबाद दुर्घटनेतील अपघातग्रस्त विमानाचा ब्लॅक बॉक्स सापडला असून त्यातून अपघाताची संपूर्ण माहिती मिळण्यास नक्कीच मदत होणार आहे.




Powered By Sangraha 9.0