विमानतळावर पोहोचण्यास १० मिनिटं उशीर अन् भूमीचे प्राण वाचले! काय घडलं?

13 Jun 2025 14:36:00



अहमदाबाद : अहमदाबादमध्ये झालेल्या विमान अपघातात अनेक प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला. लंडनमध्ये राहणाऱ्या भूमी चौहान यादेखील या विमानातून प्रवास करणार होत्या. मात्र, विमानतळावर पोहोचण्यास १० मिनिटे उशीर झाल्यामुळे त्यांचे प्राण वाचले.

गुरुवारी अहमदाबादहून लंडनला जाणारे एअर इंडियाचे बोईंग ७८७ विमान उड्डाणानंतर लगेचच कोसळल्याने २६५ जणांचा मृत्यू झाला. या विमानात २२९ प्रवासी, १२ क्रु मेंबर होते. लंडन येथील भूमी चौहान यादेखील या विमानातून प्रवास करणार होत्या. पंरतू, त्यांना विमानतळावर पोहोचण्यास उशीर झाल्याने विमान पकडता आले नाही.

याबाबत एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना भूमी चौहान म्हणाल्या की, "काल मी लंडनला परत जात होते. १.१० वाजता माझे विमान होते. १२ वाजून २० मिनिटांनी मी विमानतळावर पोहोचले. परंतू, १२ वाजून १० मिनिटांनी एअर इंडियाच्या लोकांना चेक इन करणे बंद केले होते. मी चेक इनच्या गेटवर पोहोचल्यानंतर १० मिनिटे उशीर झाल्याने मी त्यांना मला आतमध्ये जाऊ द्यावे, अशी विनंती केली. परंतू, त्यांनी मला आत न सोडता परत पाठवले."

ट्राफिकमुळे वाचला प्राण!

"अहमदाबादमधील ट्राफिकमध्ये अडकल्याने मला पोहोचायला उशीर झाला. विमानतळावरून घरी परतत असताना मी गाडीमध्येच विमान अपघाताची बातमी बघितली. अपघाताची घटना कळल्यानंतर मी देवाचे आभार मानले. परंतू, हा अपघात अतिशय भयानक आहे," असेही त्यांनी सांगितले.

Powered By Sangraha 9.0