भीषण अपघातानंतर मृतदेहांची ओळखही पटवता येईना! डीएनए चाचणी करून मृतदेह नातेवाईंकांच्या ताब्यात देणार

13 Jun 2025 13:30:58


अहमदाबाद : अहमदाबादमध्ये झालेल्या विमान अपघात इतका भीषण होता की, मृतदेहांची ओळखही पटवण्यात अडचण येत आहे. त्यामुळे आता मृत व्यक्तींच्या डीएनए चाचण्या करून त्यांचे मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

गुरुवार, १२ जून रोजी एअर इंडियाच्या AI-१७१ या विमानाचा अपघात झाला असून त्यात एकूण २४२ लोक होते. यात २०० प्रवाशी आणि १२ क्रु मेंबर होते. यापैकी २४१ जणांचा मृत्यू झाला असून केवळ एक जण या अपघातातून बचावला आहे. अहमदाबादमधील बी. जे. मेडिकल कॉलेजच्या वसतीगृहावर अपघातग्रस्त विमान कोसळल्यामुळे वसतीगृहातील अनेक विद्यार्थी आणि डॉक्टरांचाही यात मृत्यू झाला आहे.

अहमदाबाद विमान अपघाताचं सत्य उलगडणार! अपघातग्रस्त विमानाचा ब्लॅक बॉक्स सापडला; पण ब्लॅक बॉक्स म्हणजे नेमकं काय?

दरम्यान, या विमान अपघातात एकूण २६५ जणांचा दुर्दैवी अंत झाला आहे. विमान कोसळल्यानंतर त्यातून मोठमोठे आगीचे आणि धुराचे लोट उठले. यासंबंधीचे फोटो आणि व्हिडीओही माध्यमांवर व्हायरल झाले आहेत. हा अपघात इतका भीषण होता की, मृतदेहांची ओळखही पटवण्यातही अडचण येत आहे. त्यामुळे शुक्रवारी या सर्व मृतदेहांची डीएनए चाचणी करण्यात येत आहे.

मृत व्यक्ती आणि त्यांच्या नातेवाईकांची डीएनए चाचणी करून ओळख पटल्यानंतर मृतदेह नातेवाईकांकडे सोपवण्यात येत आहेत. डीएनए चाचणीसाठी मृतकांचे नातेवाईक अहमदाबादमध्ये पोहोचले असून आतापर्यंत अनेक मृतदेहांची ओळख पटल्याचीही माहिती पुढे आली आहे.


Powered By Sangraha 9.0