"मला नाही माहिती की, मी कसा वाचलो..."! विमानातील २४२ लोकांपैकी एकमेव बचावलेल्या रमेश विश्वास यांची प्रतिक्रिया

13 Jun 2025 18:55:37

Reaction of Ramesh vishwas only survivor among the 242 people on board the plane
 
गांधीनगर : मला नाही माहिती की, मी कसा बचावलो....! अशी प्रतिक्रिया विमानातील २४२ लोकांपैकी एकमेव बचावलेल्या रमेश विश्वास यांनी दिली आहे. अहमदाबादहून लंडनच्या गॅटविकला जाणारे एअर इंडियाचे बोईंग ७८७ विमान उड्डाणानंतर लगेचच कोसळल्याने अनेक कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
 
या अपघाताच्या घटनेत एक अनपेक्षित घटना घडली. विमानात असलेल्या २४२ लोकांपैकी एकमेव प्रवासी रमेश विश्वास हे बचावले आहेत. याच अपघातग्रस्त विमान प्रवासात रमेश यांचा भाऊ त्यांच्यासोबत होता. परंतू, अद्याप तरी त्यांची माहिती कळू शकलेली नाही. रमेशच्या परीवाराने सांगितले की, "रमेश आणि अजय हे दोघे भाऊ असून ते युकेमधील लेस्टरचे रहिवासी होते. आम्ही रमेशशी बोललो, तो रुग्णालयात सध्या ठीक आहे. पण दुसरा भाऊ अजयबद्दल आम्हाला काहीही माहिती मिळालेली नाही. आम्ही अजयच्या माहितीची वाट पाहत आहोत. आम्ही आजच विमानाने भारतात निघत आहोत. रमेश सुरक्षित आहे तसाच अजयही कुठेतरी सुरक्षित असेल, अशी आम्हाला आशा आहे. या घटनेने आमचा परीवार हादरला आहे."
 
अपघातग्रस्त विमान हे कॅप्टन सुमित सभरवाल चालवत होते, तर त्यांच्यासोबत फर्स्ट ऑफिसर म्हणून क्लाईव्ह कुंदर होते. गुरुवारी दुपारी १.४० वाजता हे विमान कोसळले. विमानात एकूण २३० प्रवासी होते, ज्यात १६९ भारतीय, ५३ ब्रिटिश, ७ पोर्तुगीज आणि १ कॅनेडियन नागरिक होता. बाकी उर्वरित १२ क्रू मेंबर्स होते. सुमित सभरवाल हे एक अनुभवी पायलट होते. त्यांना ८२०० तासांचा विमान उड्डाणाचा अनुभव होता. या अपघातानंतर, दिल्ली ते अहमदाबाद वाहतूक करणारी सर्व उड्डाणे रद्द करण्यात आली.
 
अहमदाबाद सिव्हिल हॉस्पिटल प्रशासनाने विमान अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या प्रवाशांच्या नातेवाईकांकडून डीएनए नमुने घेण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. जेणेकरून मृतांची ओळख पटेल. आरोग्य विभागाचे प्रधान सचिव धनंजय द्विवेदी म्हणाले की, "पीडितांची ओळख पटविण्यासाठी बीजे मेडिकल कॉलेजच्या कसोटी भवनमध्ये ही विशेष व्यवस्था करण्यात आली आहे."
 
 
Powered By Sangraha 9.0